जरांगेंचे आरोप आणि फडणवीसांचा पलटवार; संजय राऊत म्हणाले, या तर चोराच्या उलट्या बोंबा!

| Updated on: Feb 28, 2024 | 7:44 AM

Saamana Editorial on Manoj Jarange Patil Allegation Devendra Fadnavis : चोरांना चोर म्हटले की राग येतो, पण या तर चोराच्या उलट्या बोंबा!; संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा... आजच्या सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हणण्यात आलं आहे? वाचा सविस्तर...

जरांगेंचे आरोप आणि फडणवीसांचा पलटवार; संजय राऊत म्हणाले, या तर चोराच्या उलट्या बोंबा!
Follow us on

मुंबई | 28 फेब्रुवारी 2024 : मराठा आरक्षण आंदोलन सध्या वेगळ्या वळणावर आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आधी मनोज जरांगे पाटील यांचेच मराठा आंदोलनातील जुने सहकारी असणाऱ्या लोकांनीच मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केले. त्यानंतर मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. या सगळ्यावर आता सर्वत्र पडसाद उमटू लागले आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित झाला. जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. यावर आजच्या सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. उलट्या बोंबा! शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

जरांगे यांना बळ देणारे व आंदोलनात हवा भरणारे ‘हवा बाण हरडे’ फडणवीस यांच्या बगलेतच आहेत. उगाच दुसऱ्यांकडे कशाला बोटे दाखवता? दुसऱ्यांचे भाडोत्री खांदे वापरून बार उडविण्याचे खेळ शिवसेना कधीच करीत नाही. अशा खेळांत सध्याचा भाजप पारंगत आहे . भाजपच्या नेत्यांनी एक इरसाल प्रश्न विचारला आहे , तो म्हणजे जरांगे यांच्या आंदोलनास पैसे कोठून येतात ? याचे सामान्य जनतेच्या मनातले उत्तर असे की , ” महाराष्ट्रात आमदार – खासदार खरेदीसाठी जेथून पैसे येतात तेथूनच ते येत असावेत .” भाजप हा शेठजींचा पक्ष आहे व सावकारी हाच त्यांचा धंदा आहे . त्यामुळे या सावकारीचीही एस . आय . टी . चौकशी होऊ द्या ! जरांगे व त्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत भाजपच्या उलटय़ा बोंबा सुरू आहेत . चोरांना चोर म्हटले की राग येतो.

चोराच्या उलटय़ा बोंबा म्हणजे काय ते सध्याच्या भारतीय जनता पक्षाकडून शिकायला हवे. मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण? असा प्रश्न इतक्या दिवसांनंतर देवेंद्र फडणवीस व त्यांच्या भाजपातील टोळीस पडला आहे. जरांगेंची भाषा ही ठाकरे-पवारांची भाषा असल्याचा अफलातून शोधही या टोळीने लावला आहे. एखादे प्रकरण अंगलट आले की, त्यातून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न भाजप नेहमीच करतो. जरांगे पाटलांच्या बाबतीत तेच घडले आहे. मराठय़ांना सध्या दिलेले 10 टक्के आरक्षण टिकेल काय?

जर ते आरक्षण टिकणार नसेल तर सरकारकडून समाजाची फसवणूक सुरू आहे, असे जरांगे पाटील म्हणतात. मराठय़ांना ‘ओबीसी’मधून आरक्षण द्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे व ते शक्य नाही, असे सरकार म्हणते. कोणाच्याही ताटातले काढून मराठय़ांना आरक्षण नको, तर कोणाच्याही हक्कांना, आरक्षणास हात न लावता मराठय़ांना आरक्षण द्या, ही भूमिका सगळय़ांचीच असायला हवी. महाराष्ट्रातील सर्वच समाजात सलोखा राहावा. जात विरुद्ध जात असा संघर्ष गावागावांत उभा राहिला तर महाराष्ट्राच्या एकतेला तडे जातील. तसे होता कामा नये.