मुंबई | 15 फेब्रुवारी 2024 : उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करण्यात आली आहे. शेतकरी वाऱ्यावर; पंतप्रधान दौऱ्यावर! या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. शेतकऱ्यांचा सरकारवर भरवसा राहिला नसल्याचं संजय राऊत यांनी सामनाच्या या अग्रलेखात म्हटलं आहे. शेतकरी हवालदिल असताना सरकारचं त्यांच्याकडे लक्ष नाही, असं म्हणत संजय राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय.
शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी या जुन्याच मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात नव्या लढाईचा एल्गार पुकारला आहे. त्यांच्यावर पोलिसी लाठ्या, रबरी गोळ्यांचा, मारा होत आहे तर महाराष्ट्रातील बळीराजा गारांचा आणि राज्यकर्त्यांच्या बेपर्वाईचा मारा सहन करीत आहे.
दिल्लीत सुलतानी आणि महाराष्ट्रात अस्मानी या चक्रव्यूहात शेतकरी सापडला आहे. या चक्रव्यूहात त्याला तसेच ठेवून पंतप्रधान अबुधाबीत ‘अहलान मोदी’च्या आत्मानंदात मग्न आहेत. ‘शेतकरी वाऱ्यावर, पंतप्रधान दौऱ्यावर’ असे हे संकट आहे. त्यातून शेतकऱ्याची मुक्तता होणार कशी, हा खरा प्रश्न आहे.
पंजाब-हरयाणातील शेतकरी न्याय्य मागण्यांसाठी पुन्हा एकदा दिल्लीतील हुकूमशाही राजवटीला धडका देत आहेत. दिल्लीशहांच्या विरोधात त्यांनी रणशिंग फुंकले आहे. अर्थातच त्यांच्यावर हुकूमशाहीचा वरवंटा फिरवला जात आहे. त्यांचे दिल्लीचे मार्ग रोखण्यासाठी दडपशाहीचे सर्व मार्ग अवलंबले जात आहेत. अश्रुधूर, लाठीमाराचे तडाखे कमी पडले म्हणून की काय, रबरी गोळ्यांचादेखील मारा त्यांच्यावर करण्यात येत आहे.
राजधानीच्या सीमेवर शेतकऱयांविरोधात अशी सुलतानी सुरू आहे, तर महाराष्ट्रातील बळीराजावर अवकाळी, गारपिटीचे ‘अस्मानी’ संकट कोसळले आहे. मागील काही वर्षांत अवकाळी, गारपीट आणि चक्रीवादळाचे तडाखे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नेहमीचेच झाले आहेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपिटीचा तडाखा. त्यात अधूनमधून चक्रीवादळाचाही फटका बसत असतो. त्यामुळे शेतातले पीक हातात येईलच, याचा कोणताच भरवसा शेतकऱ्यांना राहिलेला नाही. ना निसर्गावर भरवसा, ना सरकारच्या आश्वासनांवर.