संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट सवाल; म्हणाले, मोदीजी, बघताय ना?

| Updated on: Apr 06, 2024 | 8:34 AM

Saamana Editorial on PM Narendra Modi : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी इस्रायलच्या मुद्द्यावरून त्यांनी नरेंद्र मोदी यांनी सवाल केला आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखात काय म्हणण्यात आलं आहे? वाचा सविस्तर...

संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट सवाल; म्हणाले, मोदीजी, बघताय ना?
sanjay raut
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

देशात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा थेट सामना होतो आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रश्न थेट सवाल केला आहे. इस्रायलच्या राजकीय परिस्थितीवरून संजय राऊत यांनी मोदींना इशारा दिला आहे. भारतातील जनतेला मोदी यांनी भ्रमाचा भोपळा दाखवला आणि तो भोपळा जनता लवकरच फोडणार आहे, असं संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. ‘मोदी, बघताय ना? इस्रायली जनतेचा उद्रेक’ या शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यातून राऊतांनी मोदींना सवाल केला आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा

मतलबी राष्ट्रवाद आणि त्याच्या जोरावर साधलेला राजकीय मतलब, या मोदी आणि नेतान्याहू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नेतान्याहू यांनी हमास युद्धाच्या आड त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी फुगविलेला राष्ट्रवादाचा फुगा तेथील जनतेने फोडला आहे.

आपल्या देशात दहा वर्षांपासून निर्माण केलेला खोट्या राष्ट्रवादाचा भ्रमाचा भोपळादेखील जनता असाच फोडणार आहे. कारण मोदी राजवटीला देण्यात आलेली राष्ट्रवाद-धर्मवादाची कल्हई आता संपली आहे. जनताही त्या भ्रमातून बाहेर आली आहे. इस्त्रायली जनतेच्या उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार आहेत. मि. मोदी, तुमचे परममित्र मि. नेतान्याहू यांच्याविरोधात तेथे काय घडतेय ते बघताय ना!

राजकीय मतलबासाठी निर्माण केलेला भ्रामक राष्ट्रवादाचा फुगा कधीतरी फुटतोच आणि या फुग्यामध्ये भरलेली राजकीय स्वार्थाची हवा जनताच कधी तरी काढते, याची दाहक जाणीव आता नेतान्याहू यांना झाली असेल. आपल्या देशातील मोदी राजवट म्हणजे तरी यापेक्षा वेगळी कुठे आहे?

नेतान्याहू यांच्याप्रमाणेच त्यांचे परममित्र म्हणजे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील मागील दहा वर्षांपासून देशात भ्रामक राष्ट्रवादाचीच हवा करीत आहेत. तीच हवा त्यांनी त्यांच्या सत्तेच्या ‘बलून’मध्ये भरली आहे. या फुग्यात कधी हिंदुत्वाची हवा भरली गेली तर कधी आर्थिक राष्ट्रवादाची. कधी 370 कलमाची तर कधी अयोध्येतील राममंदिर निर्माणाची. कधी भोजशाळा वादंगाची तर कधी नागरिकता सुधारणा कायद्याची. पुलवामासारख्या दहशतवाद्यांनी केलेल्या सैनिकांच्या हत्याकांडाचादेखील त्यांनी राजकीय स्वार्थासाठी वापर केला. मोदी सरकारचे अपयश असूनही त्याला राष्ट्रवादाचा मुलामा दिला गेला.