‘त्या’ पक्षाने ‘एकला चलो रे’चा नारा दिला; भाजपची बी टीम म्हणत राऊतांनी महिला नेत्यावर तोफ डागली

| Updated on: Jan 17, 2024 | 8:26 AM

Sajay Raut on Bahujan Samaj Party Mayavati : 'ही' वोट कटिंग मशीन महाराष्ट्र आणि देशाचं नुकसान करणार; संजय राऊतांचा महिला नेत्यावर निशाणा. या महिला नेत्या कोण? संजय राऊतांनी सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलं? लोकसभा निवडणुकांआधी संजय राऊतांचं मोठं विधान. वाचा...

त्या पक्षाने एकला चलो रेचा नारा दिला; भाजपची बी टीम म्हणत राऊतांनी महिला नेत्यावर तोफ डागली
Follow us on

मुंबई | 17 जानेवारी 2023 : लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. अशात महत्वाचे राजकीय पक्ष आणि स्थानिक नेत्यांच्या भूमिका महत्वाच्या आहेत. स्थानिक पक्ष आघाडी सोबत जाणार की महायुतीसोबत की ‘एकला चलो रे’ची भूमिका घेणार? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. उत्तर प्रदेशमधील महत्वाचा पक्ष असणाऱ्या बहुजन समाज पार्टीने आपली भूमिका जाहीर केली आहे. मायावती यांचा 17 जानेवारीला वाढदिवस असतो. याच दिवशी मायावती यांनी आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं.

मागच्या काही दिवसात मायावती इंडिया आघाडीत सामील होणार असल्याचं बोललं जात होतं. पण मायावती यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका जाहीर केली आणि या चर्चांवर पडदा पडला. मायावती यांच्या या भूमिकेवर आजच्या सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. ‘माया’वी राजकारण! या शीर्षकाखाली आजचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यातून मायावती यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आहे. मायावती या भाजपच्या बी टीम असल्याचं संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

सामना अग्रलेख जसाच्या तसा

महाराष्ट्रासारख्या राज्यास ओरबाडून सर्व माल गुजरातला नेला जात आहे. उद्योग, जमिनी, पैसा, रोजगार हिसकावून नेला जात असताना येथेही एकजूट दाखवून या प्रवृत्तीशी सामना करणे गरजेचे आहे, पण बोलायचे एक व कृती मात्र भाजप व मिंध्यांना ‘आतून’ मदत व्हावी अशी, हे ‘मायावती पॅटर्न’चे राजकारण उघड होत आहे.

‘व्होट कटिंग’ मशीन महाराष्ट्राचे व देशाचे नुकसान करीत आहे. भारतीय जनता पक्षाचे धोरण असे की, स्वतःच्या ‘बी’ टीम निर्माण करून त्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवायच्या व राजकीय स्वार्थ साधायचा. मतदारांनी अशा ‘माया’वी राजकारणापासून सावध राहायला हवे. प्रश्न देशहिताचा आहे!

लोकसभा निवडणुकांचे मैदान जवळ आले आहे. पंतप्रधान मोदी व त्यांचा पक्ष ज्या पद्धतीने मंदिर, पूजा-अर्चा, अंगारे-धुपारे यात गुंतू लागला आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक कधीही घोषित होईल, हे निश्चित आहे. त्यात भर टाकली आहे ती ‘बसपा’च्या मायावती यांनी. आगामी लोकसभा निवडणुका आपण एकटय़ानेच लढणार असे मायावती बहनजींनी जाहीर केले.

गेल्या काही काळापासून मायावती सर्व राजकीय घडामोडींपासून लांबच होत्या. त्यांच्यावर ईडी, सीबीआय वगैरे तपास यंत्रणांचा दबाव असून उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीचे प्रकरण त्यांच्या गळय़ाभोवतीचा फास बनल्याचे बोलले जात होते. त्यामुळे मायावती यांच्यातील लढाऊ बाणा थंड पडल्याची चर्चा होतीच. अशा परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मायावती नक्की कोणती भूमिका घेतील हे पक्के नव्हते, पण मायावती यांनी अपेक्षेप्रमाणे ‘एकला चलो रे’चा मार्ग स्वीकारून भाजपला मदत करण्याचे धोरण अवलंबले.

एमआयएम तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातील काही संघटनादेखील अप्रत्यक्षपणे ‘मोदीं’ची सुपारी घेऊन त्यांना मदत करण्याचेच काम करीत आहेत. मोदींविरोधी मतांची फाळणी करायची व त्यासाठी आपले स्वतंत्र उमेदवार भाजपच्या भांडवलावर उभे करायचे असे हे धोरण आहे, पण ते महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या हिताचे नाही.