बाळासाहेबांवर प्रेम होतं तर बाळासाहेबांची शिवसेना गैरमार्गाने फोडली, विकत घेतली नसती ना…. अमित शाह यांचं काय तुम्ही मनावर घेता. बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय यांचा पक्ष एक इंच पुढे सरकत नाही. त्याच बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तुम्ही फोडला ते तुमचं बाळासाहेबांवरचं प्रेम समजायचं का? तुमच्यापेक्षा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक अधिक चांगले आहेत. त्यांना बाळासाहेबांविषयी प्रेम आणि आदर आहे. तुमच्यासारखं ढोंगी प्रेम नाहीये त्यांचं पाठित खंजीर खुपसणारं, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.
आता म्हणाले, वीर सावरकरांबाबत. ही नसती उठाठेव करू नका. आम्ही सातत्याने सांगतो आहोत की सावरकरांना भारतरत्न द्या. का देत नाही आपण. आम्ही सतत दहा वर्ष आमचा घसा कोरडा करत आहोत पार्लमेंट असेल , सार्वजनिक व्यासपीठ असेल आम्ही म्हणतोय सावरकरांना भारतरत्न द्या. त्यांच्या क्रांतीकार्याचा गौरव करा. त्यांना भारतरत्न देणं शहा यांच्या हातात आहे. ३७० कलम हटवण्यात स्वत:ची पाठ थोपटवून घेतात तर द्या ना भारतरत्न. कुणी अडवलंय. बाळासाहेबांसाठी तर कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. अमित शाह यांची तर अजिबात नाही. तुम्ही तुमच्या पोस्टर आणि बॅनरवरचा बाळासाहेबांचा फोटो काढा. लोकं तुम्हाला महाराष्ट्रात उभं करणार नाही, असंही संजय राऊत म्हणालेत.
राज्यात विधानसभेची निवडणूक होतेय. अशात कोण किती जागा जिंकणार? याची चर्चा रंगलेली आहे. महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? याचा आकडा संजय राऊत यांनी सांगितला आहे. महाविकास आघाडीला १० जागा मिळणार नाही असं सांगत होते. ३१ जागा जिंकलो. सर्व्हे होता नरेंद्र मोदी ४०० पार. पण बहुमत मिळालं नाही. आता महायुतीचे लोकं कुठून सर्व्हे करतील आणि लोकांमध्ये भ्रम निर्माण करतील. यांचा भरवसा नाही. पण मी सांगतो महाविकास विकास आघाडीला १६० ते १६५ जागा मिळतील, असं संजय राऊत म्हणाले.
आमचे सर्व प्रयत्न सुरू आहेत की चोऱ्या माऱ्या करून भाजप आणि शिंदेचे लोकं जागा जिंकतात. तिथे आम्ही कार्यकर्त्यांना सावध राहायला सांगितलं आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात आता जे सरकार आहे, चंद्रचूड कृपेने किंवा मोदी आणि शहा यांच्या कृपेने बसलेलं ते पुन्हा निवडून येणार नाही याची आम्हाला खात्री आहे, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.