गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 26 डिसेंबर 2023 : इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नसल्याची टीका युतीतील नेते करत असतात. युतीचे पंतप्रधानपदाचे कणखर उमेदवार, विरोधकांकडे पर्याय दिसत नाही, अशी टिका अजित पवार यांनी केली होती. विरोधकांच्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. इंडिया आघाडीची सत्ता आल्यास चार नेत्यांपैकी कुणीही पंतप्रधान होऊ शकतं, असं संजय राऊत म्हणालेत. त्याला राऊतांनी उत्तर दिलं. युतीकडे गेल्या 10 वर्षांपासून एकच चेहरा आहे. पण आमच्याकडे बरेच पर्याय आहेत. राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी कुणीही पंतप्रधान होऊ शकतं, असं संजय राऊत म्हणालेत.
प्रकाश आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे. 24-24 हा त्यांच सुरूवातीपासूनचा प्रस्ताव आहे. वंचितला आम्ही सन्मानानं सामिल करून घेऊ. नरेंद्र मोदींचा पराभव झाला नाही. तर सर्वांना तिहार जेलमध्ये जावं लागेल, ही प्रकाश आंबेडकरांची तीव्र भावना आहे. बाबासाहेबांचा वारसा ते जपतायत, त्यामुळे ते आमच्यासोबत आहेत, असं राऊत म्हणालेत.
मंदिरात जाणारा हा भक्त असतो. पण या देशात मंदिरात जाणारा एकमेव VIP म्हणजे नरेंद्र मोदी.. हे भगवान विष्णूचे 13 वे अवतार प्रभू श्रीरामांचं बोट धरून मंदिरात नेतायेत. त्यांनी पोस्टरवर लावलेत, त्यांनी आधी कोण vip कोण सामान्य यावर बोलावं. आम्ही सामान्य म्हणून राम मंदिराच्या लढ्यात उतरलो. तेव्हा आजचे vip कुठे गेले होते? राम मंदिर पाडलं तेव्हा ही लोकं कुठे होती? बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा पुढे येऊन जबाबदारी घेतली, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला टोला लगावला.
अशोक सिंघल यांना विचारा, तेव्हा मातोश्रीवर कशा बैठका होत होत्या? 2024 नंतर कुणाचं हिंदुत्व ते दिसेल. भारतीय जनता पक्षाने घाबरून शिवसेनेवरती हे खापर फोडलं. उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्याची गरज नाही. आम्ही अयोद्धेतच आहोत. आम्ही सर्वजण अयोध्येत जाऊ, असं राऊत म्हणाले.