महाविकास आघाडीचं जागावाटप कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी सांगून टाकलं

| Updated on: Oct 03, 2024 | 11:23 AM

Sanjay Raut on Mahaviaka Aghadi Space Allocation : महाविकास आघाडीच्या जागावाटपावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरही संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. या निवडणुकीत जनता महाविकास आघाडीच्या बाजूने असेल, असंही राऊत म्हणालेत. वाचा सविस्तर...

महाविकास आघाडीचं जागावाटप कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी सांगून टाकलं
संजय राऊत, खासदार
Image Credit source: ANI
Follow us on

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. दसऱ्याच्या नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. अशात दोन्ही आघाड्यांच्या जागावाटपाचं भिजत घोंगडं असल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीचं जागावाटप कधी जाहीर होणार? असा प्रश्न ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी यावर भाष्य केलं आहे. दसऱ्यापूर्वीच महाविकास आघाडीचं जागावाटपाचं चित्र स्पष्ट होईल, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र होतो आहे आणि पुढेही एकत्रच राहणार आहोत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

जागावाटप कोणत्या मुद्द्यांवर होणार?

जो जिंकेल त्याला जागा दिली जाईल. प्रत्येक निवडणुकीत, प्रत्येक मतदारसंघात लढण्याचं आणि जिंकण्याचं गणित वेगळं असतं. त्यात अनेक फॅक्टर महत्वाचे ठरतात. उमेदवाराची क्षमता काय? पक्षाची क्षमता काय? सामाजिक स्थिती या सगळ्यावर प्रत्येक मतदारसंघाबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे जागावाटपाला थोडा वेळ लागतो आहे. आकड्यांवर जागावाटप झालं असतं तर ते तासाभरात झालं असतं. पण आम्हाला भाजप आणि त्यांच्यासोबतच्या गद्दार गटाचा पराभव करायचा आहे. भ्रष्टाचाराचा आर्थिक ताकदीचा पराभव करायचा आहे. त्यामुळे जागावाटप विचार करून केलं जातंय. दसऱ्याच्या आधी आम्ही जागावाटप करू, असं संजय राऊत म्हणाले.

तीन घटक पक्षाची संपूर्ण चर्चा पूर्ण होईल. त्यानंतर समजेल कोण कुठे लढत आहे आम्ही आकडे याच्यावर बोलतच नाही आहोत. आम्ही सगळे मिळून महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढत आहोत. लोकसभेला तेच सूत्र होते विधानसभेला तेच सूत्र असणार आहे. उमेदवाराचे क्षमता काय पक्षाची ताकद याच्यावर प्रत्येक मतदारसंघानुसार चर्चा होईल थोडा वेळ लागतो. आम्हाला भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्याबरोबर असलेल्या गद्दार पक्षाचा पराभव करायचा आहे, असं राऊतांनी सांगितलं आहे.

मोदींच्या दौऱ्यावर टीका

देशाच्या गृहमंत्री येऊन बसले आहेत. प्रधानमंत्री ठाण्यामध्ये येत आहेत. आज घोडबंदर उद्या घांटाळी, परवा कोपरी पाचपाखाडी मग नंतर नौपाड्याला जातील. मग नंतर आमच्याकडे भांडूप गावात जातील. मोदी हे प्रधानमंत्री आहेत ते त्यांनी प्रधानमंत्र्यांसारखं वागायला पाहिजे. सरदार पटेल जागा वाटपायला महाराष्ट्रात येऊन बसायचे का? सरदार पटेल महात्मा गांधी राज्यात एकच सभा घ्यायचे. आमचे जे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री आहेत. ते गल्ली बोळात फिरत आहेत. तेही देश वाऱ्यावर सोडून… एकच मेट्रोचं सहा वेळा उद्घाटन करत आहेत, असं संजय राऊतांनी मोदींच्या दौऱ्यावर टीका केली आहे.