गणेश थोरात, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, मुंबई | 01 नोव्हेंबर 2023 : मराठा आंदोलकांवर दाखल होणाऱ्या गुन्हांवर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय आहे. त्या कलाकार मुख्यमंत्र्याकडे बघायला लागेल, असं म्हणत गुन्हे दाखल करण्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनीही भाष्य केलंय. मनोज जरांगे म्हणतात ते खरं आहे. एकउप मुख्यमंत्री काडीखोर आहेत. खरं म्हणजे एक फुल, दोन हाफ हे मंत्री काडीखोर आहेत. यांनीच महाराष्ट्र पेटवला आहे, असं संजय राऊत म्हणालेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठक होत आहे. यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. संकुचित मनोवृत्तीने हा प्रश्न सुटणार नाही. या प्रश्नात राजकारण केलं जाऊ नये . हा आमचा विषय आहे. ही आमची भूमिका आहे. महाराष्ट्र पेटत असेल तर सर्व पक्षाने एकत्र येऊन याचा मार्ग काढायला हवाय, असं संजय राऊत म्हणालेत.
सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीत ऐरे गैरे नथूलाल बोलावले आहेत. ज्यांचा एकही आमदार नाही पक्षाचा अस्तित्वात नाही एखादा आमदार आहे अशा सर्वांना आमंत्रित केलं आहे. 6 आमदार आणि सहा खासदार असलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनी बोलवलं नाही. ही त्यांची संकुचित मनोवृत्ती आहे. याचा हा डरपोकपणा आहे. तुम्ही हेतू पुरस्कृत शिवसेनेला बोलावलं नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांना आमंत्रित न केल्यानं त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
आतापर्यंत आम्ही जम्मू कश्मीर आणि मणिपूरमध्ये इंटरनेट असल्याचं ऐकलं होतं. आता आपल्याकडेही हेच पाहायवा मिळतंय. मात्र याचा अर्थ तुमच्या नियंत्रणाखाली काहीच नाही. इंटरनेट कधी बंद करतात. जेव्हा कायदा सुव्यवस्था हाताबाहेर जाते तेव्हा इंटरनेट बंद केलं जातं. सर्व समाज माध्यम बंद केली जातात. तसंच आता दिसतंय. यांना परिस्थिती नियंत्रित करता येत नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली आहे.
शिंदे सरकारने ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. 31 डिसेंबरनंतर हे सगळे घरी जातील. मुख्यमंत्री शिंदे यांना ही बैठक बोलण्याचा अधिकार नाही. 31 डिसेंबरनंतर ते कायमचे घरी बसणार आहेत. हे घटनाबाह्य मुख्यमंत्री अपात्र ठरणार आहेत, असंही संजय राऊत म्हणालेत.