मुंबई | 16 जानेवारी 2024 : आज दुपारी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेआधी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. पंतप्रधान मोदी यांनी कधीही पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवली नाही, असं संजय राऊत म्हणालेत. तसंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर संजय राऊतांनी टीकास्त्र डागलं आहे. आम्ही आज पत्रकार परिषद घेत आहोत. अशी पत्रकार परिषद घेण्याची हिंमत तुमच्यात आहे का?, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.
हिंमत असेल तर स्वत: चा पक्ष काढा आणि चालवा. दिल्लीच्या मदतीने पक्ष चोरायचे. राजकारणात पाकिटमारी करायची. हे कसलं राजकारण? ही तर नामर्दानगी आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. शिवसेनेच्या तिकीटावर निवडूण आलेले आमदार पैशाच्या जोरावर पळवायचे. कोर्टबाजी करायची पक्षावर दावा सांगायचा. हे तुमचं तुम्हाला लखलाभ. पण आम्ही या विरोधात लढत राहू, असं संजय राऊत म्हणाले.
शिवसेना पक्षावर दरोडा कसा टाकण्यात आला. या मागचं सत्य काय? विषयावर उद्धव ठाकरे आज महा पत्रकार परिषद घेणार आहेत. सत्य ऐका आणि विचार करा, ही आमची भूमिका आहे. अशी खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत समोरच्यांनी दाखवावी. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवावी, असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी दिलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी मागच्या दहा वर्षात एक पत्रकार परिषद घेऊ शकले नाहीत. जनतेच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकले नाहीत. पण आज आम्ही जनतेच्या समोर पत्रकार परिषद घेतो आहोत. आज दुपारी चार वाजता उद्धव ठाकरे आणि काही कायदेतज्ज्ञ मिळून विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाची पोलखोल करतील, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.