मुंबई | 27 ऑक्टोबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शेतकरी मेळाव्याला संबोधित केलं. या भाषणादरम्यान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. विशेष म्हणजे यावेळी शरद पवार यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व्यासपीठावर उपस्थित होते. शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा प्रश्न पंतप्रधान मोदी यांनी विचारला आहे. या टीकेनंतर महाविकास आघाडीकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या टीकेला उत्तर दिलं आहे. त्यांनी शरद पवारांनी गुजरातला केलेल्या मदतीचा दाखला त्यांनी दिला आहे.
शरद पवार कृषी मंत्री होते. किंबहुना शरद पवार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जेवढी मदत केलीय तेवढी आताही होत नसेल पंतप्रधान असताना. भारतीय जनता पक्ष दुतोंडी आहे. त्याचा हा उत्तम नमूना आहे. दोन किंवा तीन वर्षापूर्वी शरद पवार यांचं कृषी क्षेत्रातील योगदान किती मोठं आहे, हे स्वत: बारामतीत येऊन सांगणारे आणि शरद पवार हे माझे राजकीय गुरू आहेत असं सांगणारे मोदी आता म्हणतात शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?, असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
शरद पवार यांना प्रश्न विचारता पण तुम्ही मागच्या 10 वर्षात काय केलं? या महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक आत्महत्या आहेत. देशभरात शेतकरी मरत आहे. आपण काळे कायदे आणले.शेतकऱ्यांसाठी तीन काळे कायदे आणले. शेतकरी एक वर्षापेक्षा अधिक काळ दिल्लीत धरणे धरले. हे मोदी आणि त्यांच्या सरकारचं अपयश आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करणार होतात सिंगलही केलं नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी तुम्ही लागू केल्या नाही. महाराष्ट्रात यायचं शरद पवार यांच्यावर बोलायचं. तेलंगणात जायचं केसीआरवर बोलायचं. पश्चिम बंगालला जायचं ममता बॅनर्जीने क्या किया. बिहारला जायचं नितीशकुमारने क्या किया… उत्तर प्रदेशात जाऊन बोला की, योगीजीने क्या किया… उत्तराखंडात जाऊन विचारा तिथल्या मुख्यमंत्र्याने काय केलं. आसाममध्येही जाऊन विचारा. ज्यांच्यापासून राजकीय भीती आहे त्यांच्यावर हल्ला करायचा. ही यांची रणनिती आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी मोदींवर घणाघात केलाय.
शेतकरी संकटात आहे. त्याला जबाबदार गेल्या दहा वर्षातील मोदी सरकारची धोरण आहे. तुम्ही शेतीचं काँट्रॅक्ट फार्मिंग सुरू केले. तीन काळे कायदे शेतकऱ्यांच्या आदोलनामुळे मागे घ्यावे. मोफत रेशनिंग हे शेतकऱ्यांना गुलाम बनवण्याचं लक्ष आहे. तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवलं का? हे तुमचं अपयश आहे, असं संजय राऊत म्हणाले.