गणेश थोरात, प्रतिनिधी टीव्ही 9 मराठी, मुंबई | 07 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपावर चर्चा सुरु आहे. त्यासाठी बैठका होत आहेत. वंचित महाविकास आघाडीत सामील व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलंय. आघाड्यांमध्ये सगळ्यांच्याच मनाप्रमाणे होत नाही. आम्ही युतीत होतो. त्या वेळी देखील आमच्या मनासारखं झालं नाही. आता आम्ही महाविकास आघाडीत आहोत. आघाडी धर्म टिकविण्यासाठी आपल्याच मनाप्रमाणे होईल हा हट्ट सोडला पाहिजे. शिवसेनेने अनेक महत्त्वाच्या जागा आघाडीमध्ये सोडलेल्या आहेत. प्रकाश आंबेडकरांबरोबर आमची चर्चा उत्तम झाली. काही जागांच्या संदर्भात पुढे चर्चा होईल, असं संजय राऊत म्हणाले.
वंचितसोबतच्या बैठकीत काहीच घडलं नाही हे सांगणं बरोबर नाही. वंचितच्या बाबतीमध्ये चर्चा फार पुढे गेली आहे. प्रकाश आंबेडकर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भाजपाला मदत होईल, असं काही करणार नाहीत. ज्याप्रमाणे मायावती करत आहेत.त्यांना संविधानाचे रक्षण करायचं आहे आणि आम्हाला सुद्धा तेच करायचं आहे. म्हणून आम्ही एकत्र आहोत, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. त्यावर वारंवार मी हे पत्र लिहितो. आमदार गोळीबार करत आहेत. लुटमार, बलात्कार, हत्या सुरू आहेत आणि गुजरातमधून ड्रग्स महाराष्ट्रात येत आहे. नाशिक पुणे मुंबई ठाणे सारख्या शहरात ड्रग्स सापडत आहेत. सरकार काय करत आहे?,असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.
ऑनलाइन जुगार ऑनलाईन लॉटरी त्याच्या मोठा फटका तरुणांना बसला आहे. ऑनलाइन जुगारवाल्यांकडून सरकारला मोठा हप्ता महिन्याला मिळत आहे. गृहमंत्र्यांनी विचारलं ते काहीही बोलतात तर मी त्यांना पुरावे देईन, असंही राऊत म्हणाले.
शिंदे गटाविषयी आम्हाला काही बोलायचं नाही. केसांनी गळा कापू नका हे कोणाला सांगत आहेत? ते माहित नाही. पण त्यांची केस आमच्याकडून संपलेली आहे. उद्याच्या निवडणुकीत त्यांच्या केसची फाईल जनता बंद करणार आहे. ज्या पद्धतीने त्यांची अवहेलना सुरू आहे. त्यावर काही बोलू शकत नाही त्यांचं त्यांनी पाहावं, असं म्हणत रामदास कदम यांच्या वक्तव्यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली.