गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 04 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसात जाहीर होईल. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होऊ शकते. तशी चर्चा सुरु आहे. यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भाष्य केलंय. प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय नेते आहेत. आमचा आणि त्यांचा उत्तम संवाद सुरू आहे. प्रत्येकाला त्यांचा पक्ष वाढावा. त्यांच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. आम्हीही करतो तेही करतात… आमच्यामध्ये हुकूमशाही विरोधात लढण्यात कोणताही मतभेद नाही, असं संजय राऊत म्हणाले.
भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा त्यांनी निर्माण केलेलं संविधान हे पायदळी तुडवण्याचं काम सुरु केलं आहे. संविधान तुडवणाऱ्याचे पाय खेचून त्यांना खाली पाडण्याची आंबेडकरांची भूमिका आहे. त्यासाठी एकीच्या वज्रमुठी ची आवश्यकता आहे. त्यासाठी उद्या आम्ही एकत्र बसत आहोत. मला खात्री आहे. प्रकाशजी हे राष्ट्रीय प्रवाहात असल्यामुळे ते पूर्णपणे देशाच्या जन माणसाचा अंदाज घेऊन इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यासोबत राहतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलाय.
भाजपकडून 195 उमेदवाराच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश नाही. यावर राऊतांनी टीका केलीय. भाजपच्या पहिल्या यादीत कृपाशंकर सिंग यांचं नाव येऊ शकतं. पवन सिंग यांचं नाव येऊ शकतो मात्र महाराष्ट्रातून नितीन गडकरी यांचा नाव पहिल्या यादीत न येणं हा त्यांचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान आहे. ते खूपच स्पष्ट वक्ता आहेत. खूपच प्रामाणिक नेते आहेत. आम्हा सर्वांना वाईट वाटलं की त्यांचं नाव नाही, असं राऊत म्हणाले.
मोदींनी असे पाच प्रकल्प दाखवले पाहिजे जे मोदींनी केले आहेत. मोदींनी दहा वर्षाचे जी उद्घाटन केली आहेत. ते प्रकल्प 2014 च्या आधीचे आहेत. मोदी आणि त्यांचे सरकार नेहमीच खोटं बोलत आलं आहे. आता दोन-तीन महिने राहिले आहेत. खोटे बोलण्याची जी नशा आहे… ती करून घ्या, असं टीकास्त्र राऊतांनी डागलं आहे.