मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरून संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. राज्यात सध्या चोर आणि लफंग्यांचं सरकार आहे. राहुल नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून काम करत आहेत. चोरांना सुरक्षा देत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही राहुल नार्वेकर या आमदार अपात्रता प्रकरणी टाईमपास करत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर थेट निशाणा साधला आहे.
विधिमंडळाचं सार्वभौमत्व राहुल नार्वेकर सांगत आहेत. चोर आणि लफंग्यांना घटनात्मक पदावरील व्यक्तीकडून संरक्षण दिलं जातंय. चोरांना ,दरोडेखोरांना सार्वभौमत्वाच्या नावावर संरक्षण देत असतील. तर त्यांचं नाव काळ्या कुट्ट इतिहासात नोंदवलं जाईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालय निर्देश दिले आहेत. नार्वेकर मात्र टाईमपास टाईमपास सिरिअल बनवत आहेत. हे लोक लंफगे आहेत. हे लोकं चोरी करुन दुसऱ्याच्या घरात घुसले आहेत. विधानसभा अध्यक्ष मात्र या चोरांना संरक्षण देत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल नार्वेकर यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदावर असताना देशाच्या काळ्या कुट्ट इतिहासात लिहिला जाईल. उद्या ते खुर्चीवर नसतील तेव्हा अशा व्यक्तींना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल. त्यांना सर्वोच्च न्यायालयातून फासावर लटकवायचे आदेश आलेले आहेत. सर्वोच्च न्यायालय शिक्षा सुनावतं. पण फासावर लटकवण्यासाठी जल्हादाची गरज असते. ही जबाबदारी आता विधानसभा अध्यक्षांवर आहे. या चाळीस आणि इतर आमदारांना घटनात्मक फासावर लटकवण्याची जबाबदारी ही तुमच्यावर असणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या. मिस्टर नार्वेकर, असं म्हणत संजय राऊतांनी राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
राहुल नार्वेकर चोरांचे सरदार हे म्हणून काम करत आहेत की संविधानाचे रखवालदार म्हणून काम करत आहेत हे त्यांनी स्पष्ट करावं. जसे चौकीदार चोर आहेत तसे संविधान पिठावर बसलेले चोर आहेत, असं म्हणण्याची वेळ महाराष्ट्रावर येऊ नये. आधीच्या राजपाल आणि या विधानसभा अध्यक्षांनी इतक्या वेळा न्यायालयाचा अपमान केला आहे की त्यांना रोज न्यायालयाने फासावर लटकवलं पाहिजे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.