मुंबई | 11 मार्च 2024 : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर यांनी काल संध्याकाळी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.’वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला. यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. संकटाना धैर्याने तोंड द्यावे लागतं. संकटांना बघून पळून जायचं नसतं. इतिहासात लढणाऱ्यांची नोंद होते… पळून जाणाऱ्यांची नाही!, असं म्हणत खासदार संजय राऊतांनी रविंद्र वायकरांवर निशाणा साधला आहे. तसंच ईडी, सीबीआय चौकशीचा दाखला देत संजय राऊत यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.
500 कोटी च्या प्रकरणात त्यांच्यावर ईडी, सीबीआयचा दबाव होता. त्या तणावात ते मागील वर्षभर होते. त्यामुळे रविंद्र वायकर यांच्या पक्षप्रवेशावर आम्हाला विचारण्यापेक्षा मुलुंडचा नागडा पोपट याला विचारा… तो कालपासून कडी लाऊन बसला आहे .ना खाऊंगा ना खाने दुंगा असं म्हणणाऱ्या मोदी-फडणवीस यांना विचारा… त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये गेल्याने रविंद्र वायकर आता स्वच्छ होतील. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याची गोष्ट करणाऱ्यांनी याचं उत्तर द्यावं. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे तापस रॉय भाजपमध्ये प्रवेश करताच 24 तासात पवित्र झाले!, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय.
केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यावरही राऊतांनी भाष्य केलंय. निवडणूक आयोग राजीनामा प्रकरणी खुलासा व्हायला हवा. त्याजागी आता कोणीही बसवू शकतात. नव्याने कोणाला नियुक्त करतील. भाजप वॉर रूममधला ही कुणी असू शकतो, असं संजय राऊत म्हणालेत.
ठाकरे गटात आज दोन पक्ष प्रवेश होणार आहेत. त्यावरही राऊतांनी भाष्य केलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज दोन महत्त्वाचे पक्ष प्रवेश होत आहेत. जळगाव अमळनेरच्या भाजपाच्या नेत्या ललिता पाटील यांचा तर दुपारी 3 वाजता डबल महाराष्ट्र केसरी, सांगलीतील पैलवान चंद्रहार पाटील हे पक्षात प्रवेश करणार आहेत, असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.