विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून सात दिवस उलटले आहेत. तरी अद्यापपर्यंत महायुती सरकारचा शपथविधी झालेला नाही. असं असतानाच विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे काम करत आहेत. असं असताना आणि मुख्यमंत्रीपद आणि खातेवाटपाबात महायुतीच्या बैठका नियोजित असताना एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरेगाव या त्यांच्या मूळगावी गेले आहेत. तर त्यांचं अस अचानक साताऱ्याला जाणं भुवया उंचावणारं आहे. अशातच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा एकनाथ शिंदे दरेगावात जातात, आजही ते मोठा निर्णय घेणार आहेत, असं शिरसाट म्हणाले.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात राज्यात उपमुख्यमंत्रिपद किंवा केंद्रात मंत्रिपदाची भाजपने ऑफर केली आहे, अशी माहिती आहे. त्यावरही संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे राज्यातच राहणार, दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत. उपमुख्यमंत्रीपदाबाबत आज शिंदे निर्णय घेणार आहेत. गृहखाते सर्वात महत्त्वाचं आहे. राज्यात गृहखाते आम्ही सक्षमपणे सांभाळू शकतो, असं शिरसाट म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे दरेगावला का गेलेत? यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी भाष्य केलं आहे. निवडणुकीच्या धावपळीत एकनाथ शिंदेसाहेबांनी आराम केला नाही. म्हणून ते गावाला आरामासाठी गेले आहेत. साहेब आराम करायला गेले आहेत, असं भरत गोगावले म्हणालेत. शिवसेना नेते भरत गोगावले यांनीदेखील महायुतीच्या खातेवाटपावर भाष्य केलं आहे. यावेळेस मला मंत्रिपद भेटेल सर्व गणित जुळून आणली आहेत. कोटावर येऊ नको मुद्द्यावर बोल, असं गोगावले म्हणालेत.
नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शिंदे साहेब सर्व निर्णय घेतील. काही लोकांना संधी मिळेल. त्यामध्ये मलाही संधी असेल.उपमुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना ज्या पद्धतीने गृहमंत्रिपद होतं. त्याच पद्धतीने गृहमंत्रिपद आम्हाला मिळावं, अशी आमची इच्छा आहे, अशी इच्छाही गोगावले यांनी व्यक्त केली आहे.