मुंबई: मुंबईतल्या शाळा 4 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरु होतील. राज्य सरकारनं दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करुन मुंबईतल्या शाळा सुरु होणार आहेत. राज्य सरकारनं शाळा सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. आता मुंबईतल्या शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. एका बाकावर एक विद्यार्थी, एक दिवसाआड उपस्थिती यासह इतर नियमांचं पालन करुन मुंबईतल्या शाळा सुरु करण्यात येणार आहेत. राज्यात सुरू करण्याचा निर्णय 24 सप्टेंबरला राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, मुंबईतील शाळा सुरू करण्यावर त्यावेळी निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे मुंबईतील शाळा सुरू कधी होणार याचं गूढ वाढलं होतं होतं. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांना 25 सप्टेंबरला विचारण्यात आलं असता त्यांनी त्यावेळी येत्या दोन दिवसात आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ, असं म्हटलं होतं.
मुंबईत शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू आहे. शिक्षकांचं 70 टक्के लसीकरणही झालं आहे. पालिकेच्या 10 हजार शिक्षकांपैकी 7 हजार शिक्षकांच लसीकरण झालं आहे. या सर्वांचा आढावा घेण्यात येणार आहे, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
राज्यात 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील 5 ते 12 वी आणि शहरी भागात 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरु होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करुन शाळा सुरु ठेवण्यात येणार आहेत. शाळा सुरु करण्यासंदर्भात टास्क फोर्सकडून सूचना मिळाल्या आहेत.
4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु होत आहेत पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे पालक मंजुरी देणार नाहीत त्यांना उपस्थित राहण्यासाठी सक्ती करु नये, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
मुंबईत कोरोना रेट कमी झाला आहे. सध्या पॉझिटीव्हिटी रेट 0.06 टक्के आहे. 100 पैकी एक ते दोन जणांचे कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. तसेच, 15% रुग्ण बेडवरच आहेत. तसेच 85% बेड रिक्त आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.
कोविड 19 विरोधात 40 टक्के नागरिक लसीकरणातून पूर्णपणे सुरक्षित आहेत. 85 टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. दोन्ही डोस घेण्यात 45 ते 59 वयोगटातील नागरिक आघाडीवर आहेत. तर आरोग्य कर्मचारी अद्याप पिछाडीवर आहेत. कोरोना विरोधात लसीकरण हेच सर्वात मोठे शस्त्र मानले जाते. मुंबईने ही आता लसीकरणात एक कोटीचा टप्पा गाठत वेग धरला आहे. पालिकेने वेगवेगळ्या स्तरावर लसीकरण सुरू केले असून आतापर्यंतच्या लसीकरण मोहिमेत 45 ते 59 वयोगटातील नागरिक आघाडीवर आहेत. या वयोगटातील 90 टक्के नागरिक पहिला तर 59 टक्के नागरिक दोन्ही डोस घेऊन पूर्णपणे सुरक्षित झाले आहेत. मात्र, ज्यांचे लसीकरण सर्वात आधी सुरू झाले म्हणजेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रटंलाईन वर्कर्स हे अजून लसीकरणात पिछाडीवर आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी 52 टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तर, 57 टक्के फ्रंटलाईन वर्कर्स सुरक्षित झाले आहेत.
इतर बातम्या:
मोठी बातमी! मुंबईतल्या शाळा सुरु होणार का? महापौर म्हणतात, दोन दिवसात आढावा