मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta fadnavis) यांना ब्लॅकमेलिंग आणि फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आलेली आरोपी अनिक्षा जयसिंघानी हिला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने अनिक्षाला पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे कोर्टात सुनावणीदरम्यान पोलिसांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याकडे तब्बल 10 कोटी रुपांच्या खंडणीची मागणी केली होती, असं पोलिसांनी कोर्टात सांगितलं आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी अनिक्षाच्या सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. पण कोर्टाने तिला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
अनिक्षाने अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्यासाठी काही व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप बनावट स्वरुपामध्ये बनवलेल्या होत्या. त्या सगळ्या व्हिडीओ आणि ऑडिओ क्लिप्स फेब्रुवारी महिन्यात अमृता फडणवीस यांना पाठवण्यात आल्या होत्या. या सगळ्या क्लिप्स डिलीट करण्यासाठी तिने अमृता फडणवीस यांच्याकडे 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. अन्यथा संबंधित क्लिप्स व्हायरल करण्याची धमकी अमृता फडणवीस यांना देण्यात आली होती, असा खुलासा पोलिसांनी कोर्टात केला.
अनिक्षा तिचे वडील अनिल सिंघानीया यांच्या विरोधात जे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते रद्द करण्यासाठी सगळे प्रयत्न करत होती. मात्र या सगळ्यामध्ये राजकीय व्यक्तींचा समावेश असू शकतो, असा दावा पोलिसांनी कोर्टात केला. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी कोर्टात अनिक्षा जयसिंघानीया हिची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली. पण कोर्टाने तिला 21 मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे. या सगळ्या प्रकरणात येत्या काळात काय-काय खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संबंधित प्रकरणी अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अनिक्षा हिला तिच्या उल्हासनगर येथील राहत्या घरुन ताब्यात घेतलं. त्यानंतर तिला मुंबई पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आलं. तिथे तिच्या चौकशीनंतर तिला अटक करण्यात आली. त्यानंतर आज तिला आज मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. या प्रकरणी मोठमोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
“महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर अनिक्षा 2021 मध्ये पुन्हा माझ्या पत्नीच्या संपर्कात आली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, मी ड्रेस डिझायनर आहे, तुम्ही माझे ड्रेस वापरुन बघा. मी आर्टिफिशअल ज्वेलरीचं काम करते. त्यांनी हळूहळू माझ्या पत्नीचा विश्वास संपादीत करण्याचा प्रयत्न केला. माझ्या आईचं निधन झालंय. तिच्यावर पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकाचं तुम्ही विश्लेषण करा, मी 50 प्रमुख महिलांमध्ये आली, माझं स्वागत करा, अशा अनेक गोष्टी सांगून ती खूप जवळ आली आणि एकदा तिने सांगण्याची गोष्ट केली की, माझे वडील पोलिसांना माहिती देत होते. बुकींना पकडून द्यायचे. त्याबदल्यात पैसे मिळायचे. तुम्ही मला या कामात मदत करा, असं तिने पत्नीला सांगितलं”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी यांनी दिलीय.
“माझ्या पत्नीने तिला स्पष्ट नकार दिला. तेव्हा तिने सांगितलं की, माझ्या पित्याला चुकीच्या गुन्ह्यांतर्गत फसवलं गेलंय. तेव्हा माध्या पत्नींनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यास सांगितलं. आम्हाला ती चुकीचं काम करत असल्याचं लक्षात आलं. दरम्यान ती बोलून गेली की, मी माझ्या पित्याला सोडवण्यासाठी एक कोटी रुपये देऊ. त्यानंतर माझ्या पत्नीने तिला मोबाईलवर ब्लॉक केलं. त्यानंतर तिने दुसऱ्या फोननंबरवरुन काही मेसेज आणि व्हिडीओ समोर आले”, असं फडणवीसांनी सांगितलं.