गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 27 डिसेंबर 2023 : राममंदिराच्या उद्घाटन होणार आहे. इथं उद्धव ठाकरे यांना बोलावण्यात आलं नाही. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप रणछोडदास असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. 2014 नंतर देश निर्माण झाला म्हणाणारे स्वत: ला रामापेक्षा मोठं मानतात का?, असा थेट सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसंच गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेलाही संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
कोण काय म्हणतंय. कोण काय सांगतंय… ही चटण्या लोणची आहेत. भाजपकडे त्यांच्या लोकांकडे फार लक्ष देणं गरजेचं नाही. कारण इतिहास साक्षीला आहे. इतिहास आणि भाजपचा काहीही संबंध नाही. देशाचा इतिहास घडवण्यामध्ये मग तो देशाचा स्वातंत्र्यलढा असेल. मुंबईचा लढा असेल. संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल. आयोध्या आंदोलन असेल. देशातील कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात ही लोक नव्हती. त्यामुळे यांना दुसऱ्यांविषयी पोटदुखी आहे, असं म्हणत राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलाय.
भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी राम मंदिराचं उद्धाटनावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. व्हीव्हीआयपी लोकांना या राम मंदिराच्या उद्घटनासाठी बोलावलं आहे. राज ठाकरे व्हीव्हीआयपी आहेत. तर उद्धव ठाकरे हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. कोण महाजन? मी फक्त एकाच महाजनांना ओळखतो. ते म्हणजे प्रमोद महाजन. प्रमोद महाजन यांचं शिवसेना भाजप युतीसाठी शेवटपर्यंत योगदान होतं. तेच महाजन मला फक्त माहिती आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
हे कधी भगतसिंग, पंडित नेहरू महात्मा गांधी घडवू शकले नाहीत. हे काहीच घडवू शकले नाहीत. मुळात यांचा जो देश आहे हे म्हणतात 2014 नंतर निर्माण झाला. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा देखील 2014 नंतरच निर्माण झाला आणि आयोध्या आंदोलन त्याआधीच आहे. हे पळकुटे आहेत, हे रणछोडदास आहेत, इतिहास हा भाजपने पाहिला पाहिजे शिवसेना कुठे होती, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.