गणेश थोरात, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी |15 फेब्रुवारी 2024 : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन दिवसाआधी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसला रामराम करत त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. त्यांच्या या पक्षांतरावरू ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. उद्या अशोक चव्हाण यांनी जरी काँग्रेसवर दावा सांगितला असता तर त्यांचाही निकाल अशोक चव्हाण यांच्या बाजूने लागला असता. नरेंद्र मोदींची हीच गॅरंटी आहे, असं संजय राऊत म्हणाले. राजधानी दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर संजय राऊतांनी भाष्य केलंय. मोदी सरकार आता शेतकऱ्यांवर गोळीबार करण्याच्या मनस्थितीत आहे, असं संजय राऊत म्हणाले.
आधी भ्रष्टाचार करा मग पक्ष फोडा आणि मग आमच्याच पक्षाच्या मूळ पक्षावर दावा करा. तुमचा जन्म त्या पक्षात झाला नसला तरी त्या पक्षावर दावा करू शकता. ही एकमेव मोदी गॅरेंटी आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांचा मी अभिनंदन करतो की त्यांनी शिंदे आणि अजित पवार यांच्याप्रमाणे दावा सांगितला नाही. जर त्यांनी हा दावा सांगितला असता तर त्यांना पक्षाचं चिन्ह मिळालं असतं आणि नाव देखील मिळालं असतं, असं संजय राऊत म्हणाले.
राज्यसभा निवडणुकीवरही संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. प्रफुल्ल पटेल यांची साडेचार वर्षे शिल्लक असताना ते परत निवडणुकीला उभे राहिले. या देशांमध्ये आधी असं घडलं नव्हतं. प्रफुल्ल पटेल यांच्यावरील अपात्रतेची टांगती तलवार आहे. ते अपात्र ठरू नये यासाठी अजित पवार यांच्या गटात पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी घेतली, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
अशोक चव्हाण आणि त्यांच्या गटाने चंद्रकांत हंडोरे यांना क्रॉस वोटिंग केलं. एक दलित चेहऱ्याला मतदान करून त्यांना राज्यसभेवर पाठवणं अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. भाजपकडून निष्ठावांतांना सतरंज्या उचलायला लावायच्या आणि बाहेरच्यांना उमेदवारी द्यायच्या यासाठी आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, असा उपरोधित टोला संजय राऊतांनी लगावला आहे.