राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा खरा चेहरा उघडा पडला आहे. संविधान ज्या विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं. त्यांचे फोटो फाडण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. कधी काँग्रेस फोडायची. तर कधी बाबासाहेब आंबेडकर यांबाबत अशी कृती करायची आणि नंतर सांगायचं की चुकून झालं… मुळात बाबासाहेबांबाबत अशी कृती मान्यच नाही. या प्रकरणात ॲट्रॉसिटी लागतेच. ही चूक म्हणत कातडी वाचवता येणार नाही. महाराष्ट्र असा घटनेला कधी माफ करणार नाही. सरकारने सुद्धा चूक भविष्यात घडू नये. म्हणून काळजी घेण्याची आवश्यकता आहे. संविधानाच्या चौकटीत कारवायी करणं गरजेचं आहे, असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणालेत.
आज शरद पवार गटाचा खरा चेहरा समोर आलेला आहे. आज यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. संविधानाचा सन्मान असेल तर शरद पवार यांनी समोर यायला हवं. ही चूक आहे ते त्यांनी सांगायला हवं. ही घटना धक्कादायक आहे. यासाठी सरकारने अशी चूक पुन्हा घडू नये म्हणून याची काळजी घ्यावी. बाबासाहेब यांची उंची मोठी आहे. त्यामुळे अशी चूक करता येणार नाही, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. महाडच्या चवदार तळ्यावर त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मनुस्मृतीमधील श्लोक अभ्यासक्रमात घेण्याला जितेंद्र आव्हाडांचा विरोध आहे. यावेळी आव्हाडांच्या हातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पोस्टर फाडलं गेलं. यावर राज्यभरातून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. भाजपने यावरून आव्हाडांवर निशाणा साधला आहे. तर ही अनावधानाने झालेली चूक आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात पुणे शहर भाजप पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजपचे निषेध आंदोलन करण्यात येत आहे. पुणे स्टेशन परिसरातील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आंदोलन सुरु आहे. जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो फाडल्याप्रकरणी आंदोलन करण्यात येत आहे.