शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांना अब्रुनुकसानीच्या केसमध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा हा खटला दाखल केला होता. या प्रकरणात माझगाव सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात संजय राऊतांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात राऊतांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर ठाकरे गटाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
अब्रुनुकसानीच्या प्रकरणात संजय राऊत दोषी ठरवण्यात आल्यानंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. न्यायालयाने प्राथमिक स्तरावरची निरिक्षणं नोंदवली आहेत. कोर्टाने नोंदवलेल्या निरिक्षणांचाही आदर आहे. पण याचा अर्थ असा नसतो की सगळे रस्ते लगेचच बंद झालेत. सोमय्या म्हणतात की आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. तर मग अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करताना यांचा न्यायालयावरचा विश्वास कुठे गेला?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
नील सोमय्या असं म्हणाले की 15 दिवसांची तरी का होईना राऊतांना शिक्षा झाली, हे महत्वाचं आहे. जर नील सोमय्या आणि भाजपच्या दृष्टीने काही ना काही शिक्षा होणं हे महत्वाचं वाटत असेल. तर मग अमित शाह यांना तडीपाराची शिक्षा झाली होती. तर मग तडीपार अमित शाह असं आम्ही सातत्याने म्हणायचं का? आम्ही असं म्हटलं तर चालेल का? न्यायालयाने आज जे काही निरिक्षण नोंदवलं आहे. त्यावर आम्ही वरिष्ठ न्यायालयात आम्ही आमचं म्हणणं मांडू, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
मीरा-भाईंदर महापालि मध्ये 154 सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली होती. त्यातील 16 शौचालय बांधण्याचं कंत्राट भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्र सादर करुन मेधा सोमय्या यांनी मीरा-भाईंदर पालिका अधिकाऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणाच्या सुनावणी झाली. यात संजय राऊतांना 15 दिवसांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.