शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मात्र वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. हे लोक आपल्या सोबत होते. तेव्हा चांगले होते. मात्र झालं असं की ढवळ्यासोबत पवळ्या बांधला. वान नाही पण गुण लागला… हे भाजपच्या संगतीला गेले, तसे त्यांचे संगीत गुण बदलले. त्यामुळे त्यांचे गुण घेतले त्यांच्यावर काय बोलणार, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. टीव्ही 9 मराठीशी बोलताना सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटानेत्यांवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे.
एक उत्तम वाजंत्री असतो ना तो मड्यालाही वाजवतो आणि लग्नातही वाजवतो, फक्त एक नियम, मड्याच्या ठिकाणी लग्नाचं वाजवायचे नसते. एकनाथ शिंदे नावाच्या व्यक्तीकडे किंवा त्यांच्या लोकांकडे संस्कार असतील. तर एखादा शत्रू जरी असला तरी त्याला आपण शुभेच्छा देतो. वाढदिवसाच्या दिवशी तो सुखाचा असतो. त्यादिवशी सदिच्छा द्याव्यात असा आपल्यावर संस्कार आहेत. आज त्या 40 जणांच्या उद्धारकर्त्यांचा वाढदिवस आहे. त्यांनी ऋणनिर्देश दिन म्हणून ऋण मानावेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्यात.
उद्धव ठाकरेंना वडिलांचा विसर पडलाय, अशी टीका शिंदे गटाकडून करण्यात आली. यालाही सुषमा अंधारेंनी प्रत्युत्तर दिलंय. हे कुणी सांगावं? शिंदेंनी? त्यांना स्वतःच्या वडील संभाजीराव यांचे नाव लावण्यात संकोच वाटतो. त्यांचा फोटो लावण्यात संकोच वाटतो. म्हणून उद्धवसाहेबांच्या वडिलांचा फोटो लावतात. आपला बाप द्यायचा सोडून आणि दुसऱ्याचा पाहिजे… तुमच्या वडिलांचा फोटो लावा ना. त्यांचा गवगवा करा ना…, असंही सुषमा अंधारे म्हणाल्यात.
अमित शाह यांनी पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरे औरंगजेब फॅनक्लबचे अध्यक्ष आहेत, असं अमित शाह म्हणाले. त्यांच्या या टीकेला अंधारेंनी प्रतिक्रिया दिलीय. ज्याच्या अंगावर जस्टिस लोयाच्या रक्ताचे डाग आहेत. अश्या गुजरातच्या तडीपार गुंडांनी आम्हाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. आम्ही काय आहोत आम्हाला माहिती, गुजरातच्या तडीपारने आम्हाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.