मुंबई, मुंबईत पावसानेही विश्रांती घेतलेली असताना पावसाळी आजारांनी मात्र डोकेदुखी वाढविली आहे. गेल्या एकाच आठवड्यात स्वाइन फ्लूच्या (Swine flue) रुग्णांमध्ये 43 इतकी तर मलेरिया (malaria) आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये अनुक्रमे 166 आणि 155 इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तूर्तास कोरोना आटोक्यात आहे मात्र साथीच्या रोगांनी डोकं वर काढल्याने मुंबईकरांसाठी नवीन समस्या निर्माण झाली आहे. मुंबईच्या गजबजलेल्या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव अधिक असल्याने या रोगांचा धोका अधिकच वाढला आहे. झोपडपट्टी परिसरात मलेरिया आणि डेंग्यू सदृश आजारांनी थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी शुद्ध येत नसल्याने नागरिकांमध्ये पोटाच्या विकारासंबंधी तक्रारी आहेत.
पावसामुळे पाणी साचून राहत असल्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने आणि दूषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. यामध्ये दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, कावीळ असे आजार होतात. तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. ‘पावसाळी आजार रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून घरोघरी तपासणी करण्यात येत असून औषधांचे वाटपही करण्यात येत आहे.
दरम्यान, पावसाळी आजारांच्या पार्वभूमीवर नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
जूनमध्ये मलेरियाचे 350, लेप्टोचे 12, डेंग्यू 39, गॅस्ट्रो 543, हिपेटायटिस 64, चिकनगुनिया 1 तर स्वाइन फ्लूचे केवळ दोन रुग्ण आढळले होते. ही आकडेवारी पाहता जुलैमध्ये पावसाळी आजारांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे.