मुंबई : मुंबईतील टाटा रुग्णालयाला 120 कोटी रुपये किंमत असलेली जमीन दान करण्यात आली आहे. सध्याच्या टाटा रुग्णालयापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर असलेली ही जमीन एका दानशूर महिलेने देणगी म्हणून दिली आहे. टाटा मेमोरियल रुग्णालय हे कर्करोगग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे देशातील सर्वात मोठे रुग्णालय आहे.
30 हजार चौरस फुटाची जागा
टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांची यादी मोठी असते. त्यामुळे अनेकांना वाट पाहत थांबावे लागते. त्यावर उपाय म्हणून मुंबईतील एका दानशूर महिलेने तिच्या मालकीची अंदाजे 120 कोटी रुपये किंमतीची जमीन टाटा रुग्णालयाला केमोथेरपी केंद्र सुरु करण्यासाठी दिली आहे.
आणखी 18 दानशूर व्यक्तींचाही पुढाकार
मुंबईतील 61 वर्षांच्या दीपिका मुंडले यांनी त्यांची वडिलोपार्जित 30 हजार चौरस फुटाची जागा टाटा रुग्णालयाला देणगी म्हणून दिली आहे. तर आणखी 18 दानशूर व्यक्तींनी त्या ठिकाणी केंद्राच्या बांधकामासाठी एकत्रितपणे देणगी दिली आहे. ही रक्कमही जवळपास 18 कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे.
टाटा रुग्णालयाची स्थापना
मेहेरबाई टाटा यांचे 1932 मध्ये रक्ताच्या कर्करोगाने निधन झाल्यानंतर, त्यांचे पती दोराबजी टाटा यांना त्यांच्या पत्नीवर उपचार करणाऱ्या रुग्णालयासारखी सुविधा भारतात आणायची होती. दोराबजींच्या मृत्यूनंतर त्यांचे उत्तराधिकारी नोरोजी सकलटवाला यांनी त्यांचे प्रयत्न पुढे सुरु ठेवले. शेवटी, जेआरडी टाटांच्या पाठिंब्याचा परिणाम म्हणून मुंबईतील कामगार वस्ती असलेल्या परेलच्या मध्यभागी टाटा मेमोरियल हॉस्पिटल या सात मजली इमारतीचे स्वप्न 28 फेब्रुवारी 1941 रोजी साकार झाले.
टाटा मेमोरियल रुग्णालय हे कर्करोगग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे भारतातील सर्वात मोठे रुग्णालय असून इथे कॅन्सर पीडित रुग्णांची उपचारासाठी मोठी गर्दी होते. टाटा रुग्णालयात भारतातील कर्करोगाच्या जवळपास एक तृतीयांश रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती आहे. इथे प्राथमिक चिकित्सेसाठी आलेल्या 60% रुग्णांवर मोफत उपचार केले जातात.
15,000 चौरस मीटर क्षेत्रावर पसरलेल्या 80 बेड्सच्या रुग्णालयापासून सुरुवात करुन टाटा मेमोरियल रुग्णालय आता सुमारे 70,000 चौरस मीटर क्षेत्रामध्ये पसरले आहे. इथे आता 600 पेक्षा जास्त बेड्स आहेत. 1941 मध्ये 5 लाख रुपये वार्षिक बजेट असलेल्या या हॉस्पिटलचे आता 120 कोटी रुपयांच्या जवळपास बजेट आहे.
रोज 500 रुग्णांना केमोथेरपी
नवे केमोथेरपी केंद्र झाल्यानंतर सध्या असलेल्या व्यवस्थेवरील ताण मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. सध्या रुग्णालयात केमोथेरपीसाठी 100 बेड असून रोज 500 रुग्णांना केमोथेरपी दिली जाते, असे असले तरी आजही रुग्णांना केमोथेरपीसाठी 30 दिवसांची वाट पहावी लागते.
संबंधित बातम्या :
कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवाऱ्यासाठी म्हाडाची घरे; पवारांनी दिल्या टाटा रुग्णालयाला चाव्या