संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. अशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सध्या विरोधी पक्ष असणाऱ्या परंतू, जुना मित्र पक्ष असणाऱ्या भाजपबाबत मोठा दावा केला आहे. 2019 ला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला शब्द दिला होता, असं उद्धव ठाकरे एका मुलाखतीत म्हणालेत. 2019 ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून मी दिल्लीला जाईल, असा शब्द देवेंद फडणवीस यांनी मला दिला होता, असं दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची एका वृत्तपत्रात मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. यात त्यांनी मोठा दावा केला आहे. शिवसेना आणि भाजप अडीच- अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घेतील, असं अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत ठरलं होतं. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, की आदित्यला मुख्यमंत्री बनवून स्वत: दिल्लीत जातील म्हणून पण त्यांनी माझ्याच माणसांसमोर मला खोटं पाडलं, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
आम्ही हिंदुत्व आणि देश या दोन मुद्द्यांवर भाजपसोबत होतो. मग त्यांनी आमच्यासोबत असं का केलं? 2014 ला नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा आम्हालाही आमचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं होतं. पण अमित शाह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांची चाल बदलली, असं उद्धव ठाकरे या मुलाखतीत म्हणालेत.
तुम्ही सर्व्हे केला आहे का? असं अमित शाह यांनी 2014 ला आम्हाला विचारलं. मी म्हणालो, आम्ही लढणारे आहोत. सर्वेक्षणाची गरज नाही. सर्वेक्षणात पराभव होताना दिसल्यास तुम्ही लढवणं सोडणार का?, असं मी त्यांना म्हटल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
आधी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्यासोबत वाटाघाटी व्हायच्या तेव्हाही रस्सीखेच व्हायची. नंतर भाजपचे लोक अहंकाराचे आकडे दाखवू लागले. बाळासाहेब गेल्यामुळे आता हल्ला करता येईल, असा त्यांचं म्हणणं होतं. तेच त्यांनी 2019 ला माझ्यासोबत केलं, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.