विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते विनय सहस्रबुद्धे यांनी काही नेत्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ‘नक्की काय चाललंय?’ या मुलाखत सत्रात त्यांनी आठ नेत्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. यात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचीही मुलाखत विनय सहस्रबुद्धे यांनी घेतली आहे. यात उज्ज्वल निकम यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 26/11 चा हल्ला, कसाबची फाशी यावरही उज्ज्वल निकम बोलते झालेत. 26/11 च्या हल्ल्यावर बोलताना उज्ज्वल निकम यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर भाष्य केलं. फडणवीसांमुळेच आपण पाकिस्तानचं पाप सिद्ध करू शकलो, असं उज्ज्वल निकम म्हणालेत.
नोकरशाही काहीशी गोंधळलेली असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णायकतेमुळे आपण काही गोष्टी सिद्ध करू शकलो. ते मुख्यमंत्री असतांना त्यांनी डेव्हिड हेडलेला साक्षीदार करून त्याची जबानी घेण्यास तत्काळ मान्यता दिली. त्यामुळे कसाबला फाशी होऊन सुद्धा 26/11 च्या हल्ल्यामागे पाकिस्तानचे षड्यंत्र असल्याची जी बाब आपण जगाच्या वेशीवर टांगू शकलो नव्हतो. ती त्यांच्या काळात न्यायालयात व्यवस्थित सिद्ध करून पाकिस्तानचं पाप आपण जगासमोर निर्विवादपणे उघड करू शकलो, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं.
निर्णायक नेतृत्व हे भाजपचे वैशिष्ट्य आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनीही कायम दहशतवादाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली. मी भाजपामध्ये नसतानाही दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्याच्या विषयात मला माझ्या सूचनांवर नेहमीच तात्काळ आणि योग्य निर्णय घेतले. राष्ट्र-प्रथम ही मानसिकता असलेले नेतृत्व ज्यावेळी सत्तेत असते तेव्हाच अशी निर्णय क्षमता दिसून येते, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.
विनय सहस्रबुद्धे यांनी आठ मुलाखती घेतल्या आहेत. उद्यापासून या मुलाखती पाहायला मिळणार आहेत. ‘नक्की काय चाललंय?’ या शीर्षकाखाली अनेकांचे विचार वाचायला मिळणार आहेत. त्यातील पहिली मुलाखत ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची आहे. प्रा. सदानंद मोरे, पोपटराव पवार , पाशा पटेल, स्मृती इराणी, मिलिंद कांबळे आणि काही युवा उद्योजकांच्या मुलाखती विनय सहस्रबुद्धे घेणार आहेत. उद्यापासून एका दिवसाआड एक या पद्धतीने समाज माध्यमांवर या मुलाखती प्रसारित होणार आहेत. या मुलाखत मालिकेत विनय सहस्रबुद्धे एका नव्याच भूमिकेत दिसणार आहेत.