उत्तर-मध्य मुंबईतून महायुतीचा उमेदवार कोण असणार? याची सर्वत्र चर्चा होती. अशातच भाजपने सर्वसामान्यांना अनपेक्षित नाव जाहीर केलं. उत्तर-मध्य मुंबईतून ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. विद्यमान खासदार पूनम महाजन यांचं तिकीट कापत भाजपने निकम यांना उमेदवारी दिली. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर होताच विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. शिवाय कायद्याचे अभ्यासक असणारे उज्ज्वल निकम यांना उमेदवारी का दिली गेली असावी? उज्ज्वल निकम राजकारणात कसे आले असावे? याची चर्चा होऊ लागली. एका मुलाखती दरम्यान उज्ज्वल निकम यांनी राजकारणात येण्याचं कारण सांगितलं.
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम हे अचानकपणे राजकारणात कसे आले? यावर ते बोलते झाले. 15 दिवसांआधी राजकारणात येण्याबाबत भाजपकडून विचारण्यात आलं. तुम्ही राजकारणात यावं आणि उत्तर-मध्य मुंबईतून भाजपचे उमेदवार म्हणून लढावं म्हणून विचारण्यात आलं. तेव्हा मी राजकारणात येण्यासाठी सकारात्मक नव्हतो, असं उज्ज्वल निकम म्हणाले.
भाजपकडून लोकसभा लढण्याविषयी विचारण्यात आल्याचं मी घरी सांगितलं. तेव्हा त्यांनी मला यावर विचार करावा, असं सुचवलं. मीही विचार केला. घरात बोललो. आमच्या घरातच लोकशाही पद्धतीने मतदान झालं. तेव्हा निवडणूक लढवावी, याला बहुमत मिळालं. मी राजकारणात येण्यासाठी फारसा सकारात्मक नव्हतो. पण मग घरच्यांचं राजकारणाात जाण्यासाठी एकमत असल्याने मी राजकारणात आलो आणि आता लोकसभा निवडणूक लढवतो आहे, असं उज्ज्वल निकम म्हणाले.
काही वर्षांआधी देखील मला राजकारणात येण्याबाबत एका राजकीय पक्षाने विचारलं होतं. पण तेव्हा मी विचार करून कळवतो, असं म्हटलं. पण तेव्हा मी राजकारणात आलो नाही. तेव्हा मी राजकारणात येण्यासाठी सकारात्म नव्हतो, असं उज्ज्वल निकम म्हणाले.
उत्तर-मध्य मुंबईत भाजपकडून उज्ज्वल निकम तर काँग्रेसकडून वर्षा गायकवाड निवडणूक लढवत आहेत. महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी ही लढत होणार आहे. उत्तर-मध्य मुंबईत कोण जिंकणार याची अनेकांना उत्सुकता आहे. 4 जूनला निकाल लागल्यानंतर याचं उत्तर मिळणार आहे.