मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेचा वरचष्मा दिसून आला. 10 पैकी 5 जागांवर युवासेनेचे उमेदवारांनी विजयश्री खेचून आणला. या मुसंडीमुळे युवासेनेचा आनंद दुप्पट झाला आहे. आता उर्वरीत जागा सुद्धा खिशात टाकण्याची कवायत युवा सेना पूर्ण करणार का हे निकालाचे चित्र समोर आल्यावर स्पष्ट होईल. सिनेट निवडणुका पुढे ढकलण्याची खेळीवर सुप्रीम कोर्टापर्यंत न्यायालयीन लढाई खेळली गेली. कोर्टाने कान टोचल्यानंतर ही निवडणूक तातडीने घेण्यात आली.
10 पैकी 5 जागा खिश्यात
युवासेनेने या निवडणुकीत मोठं यश मिळवण्याचा दावा केला होता. आता आलेले निवडणुकीचे निकाल आणि कल पाहता युवासेनेने मोठा चमत्कार केला असं म्हटलं तर वावगं ठरू नये. राखीव गटातील युवासेनेचे 5 उमेदवार विजयी ठरले आहेत. ठाकरे गटाने जोरदार मुसंडी मारली, आता अजून किती जागा आदित्य सेना खिशात घालते याचे चित्र लगेच समोर येईल. तर दुसरीकडे खुल्या गटातीलही युवासेनेचे 5 उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आदित्य सेनेने या निवडणुकीत विरोधकांना धूळ चारल्याची जोरदार चर्चा विद्यार्थ्यांमध्ये रंगली आहे.
राखीव गटातील विजयी उमेदवार
युवा सेना ठाकरे गटाच्या शीतल देवरुखकर यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातून (SC) 5498 मतं खेचून आणली. तर त्यांच्याविरोधातील उमेदवार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राजेंद्र सायगावकर यांना 1014 मते पडली. देवरुखकर यांनी एबीव्हीपीवर मात करत विजयाचा झेंडा फडकवला. तर अनुसूचित जमाती प्रवर्गात (ST) युवासेना धनराज कोहचाडे यांना 5247 मते मिळाली. तर ABVP च्या उमेदवार निशा सावरा – 918 यांना मतदान खेचण्यात यश आले नाही. त्यांना हजाराचा टप्पा गाठता आला नाही. युवासेनेचे मयूर पांचाळ आणि स्नेहा गवळी यांनी पण विजयाचा फेटा डोईवर बांधला आहे. धनराज कोहवाडे आणि शशिकांत झोरेही विजयी झाले.
10 जागांवर 55 टक्के मतदान
मतदानाच्या आधी एक दिवस निवडणूक स्थगित केल्यानं न्यायालायने मुंबई विद्यापीठाला फटकारले होते. त्यानंतर लगेचच मंगळवारी 24 सप्टेंबर रोजी मतदान घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्याआधारे मंगळवारी या निवडणुकीसाठी मतदान झाले. एकूण 10 जागांसाठी 55 टक्के मतदान झाले. यामध्ये पाच जागा खुल्या प्रवर्गातील तर पाच राखीव प्रवार्गातील आहेत.