ठाकरे की भाजप? मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, कोण मारणार बाजी?

| Updated on: Sep 27, 2024 | 9:19 AM

या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे ठाकरे की भाजप कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

ठाकरे की भाजप? मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, कोण मारणार बाजी?
Follow us on

Mumbai University Senate Election Result : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांचा निकाल आज (27 सप्टेंबर 2024) लागणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधरकांच्या जागांकरिता मंगळवारी 24 सप्टेंबर 2024 रोजी मतदान पार पडले होते. आज या निवडणुकांची मतमोजणी केली जाणार आहे. या 10 जागांवरील निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे ठाकरे की भाजप कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांची मतमोजणी आज होणार आहे. सिनेटच्या निवडणुकीत ठाकरे गटाची युवासेना आणि अभाविप यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या १० जागांवरील सिनेट निवडणुकीसाठी एकूण २८ उमेदवार मैदानात उतरले आहेत. विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील एकूण ३८ मतदान केंद्रावर आणि ६४ बूथवर सिनेट निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीच्या मतदारांची एकूण संख्या १३,४०६ इतकी आहे. मात्र 24 सप्टेंबरला झालेल्या सिनेट निवडणुकीत एकूण मतदानाच्या फक्त 55 टक्के मतदान झालं.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी युवासेना आणि अभाविपने सर्व दहा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर छात्रभारतीने चार, मनसेनं (MNS)  एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे. तर एकनाथ शिंदे गटाकडून एकही उमेदवार सिनेटच्या निवडणुकीत उतरवण्यात आलेला नाही.

सिनेट निवडणुकीसाठी अभाविपच्या उमेदवारांची नावे

  • हर्षद भिडे
  • प्रतीक नाईक
  • रोहन ठाकरे
  • प्रेषित जयवंत
  • जयेश शेखावत
  • राजेंद्र सायगावकर
  • निशा सावरा
  • राकेश भुजबळ
  • अजिंक्य जाधव
  • रेणुका ठाकूर

ठाकरेंच्या युवासेनेच्या उमेदवारांची नावे

  • प्रदीप सावंत
  • मिलिंद साटम
  • परम यादव
  • अल्पेश भोईर
  • किसन सावंत
  • स्नेहा गवळी
  • शीतल शेठ
  • मयूर पांचाळ
  • धनराज कोहचडे
  • शशिकांत झोरे

मतमोजणी करून निकाल जाहीर करण्याचे आदेश

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक रविवारी (22 सप्टेंबर) रोजी पार पडणार होती. मात्र मतदानाआधी शुक्रवारी रात्री अचानक विद्यापीठाने एक परिपत्रक काढत ही निवडणूक स्थगित केली. या निर्णयाला युवा सेनेकडून मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टानं विद्यापीठानं दिलेली स्थगिती रद्द करत लगेचच निवडणूक घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार २४ सप्टेंबरला सिनेट निवडणूक पार पडली.

तर दुसरीकडे मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांची मतमोजणी थांबवण्याची विनंती उच्च न्यायालयात करण्यात आली. मात्र, न्यायालयाने ती फेटाळून लावत मतमोजणी करून निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे, राज्य सरकार आणि विद्यापीठ प्रशासन चांगलीच चपराक बसल्याची टीका युवासेनेकडून होत आहे.