महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. सगळीकडे निवडणुकीचा माहौल आहे. राजकीय नेते एकमेकांवर टीका टिपण्णी करताना दिसत आहेत. अशातचस मुंबई शहरातील एका पोस्टरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुंबईतील अंधेरी भागात काही पोस्टर्स लागले आहेत. या पोस्टर्सने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ‘उत्तर भारतीय सेना’ या संघटनेने काही पोस्टर अंधेरी भागात लावले आहेत. या पोस्टरवरील मजकुराने लक्ष वेधून घेतलं आहे. हे पोस्टर म्हणजे एका अर्थी मनसेला इशारा असल्याचं बोललं जात आहे.
‘उत्तर भारतीय सेना’ या संघटनेने अंधेरी पश्चिममध्ये काही पोस्टर लावलेत. सावधान… उत्तर भारतीय बटोगे… तो पिटोगे!!, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे. ‘बटेंगे ते काटेंगे’च्या आधारावर मुंबईत ‘उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे’ असे पोस्टर लावण्यात आले आहेत. हे पोस्टर उत्तर भारतीय सेनाने मुंबई शहरातील अंधेरी परिसरात लावले आहेत.
उत्तर भारतीय सेना अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला यांनी या पोस्टरबाबत प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र भाजपने उत्तर भारतीयांची मन दुखावली आहेत. उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्या मनसेच्या पाठीशी भाजप उभा आहे. ज्या पक्षाला उत्तर भारतीयांना मारायचे आहे, त्याला मत देऊ नका. मौलानाला 16 हजार रुपये पगार देतात पण पंडितांना एक रुपयाही देत नाही. भाजपचे गुपित उघड झालं आहे. राज ठाकरे यांनी आजपर्यंत कोणत्याही कार्यक्रमात जय श्री रामचा नारा लावला नाही. कारण ते उत्तर भारतीय विरोधी आहेत, असं शुक्ला यांनी म्हटलं आहे.
उत्तर भारतीयांबाबत मनसे पक्षाने कायम आक्रमत भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी जाहीर भाषणांमध्ये उत्तर भारतीयांवर तोफ डागल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असतानाच राज्यात विधानसभेची निवडणूक होत असताना हा मनसेसाठी इशारा आहे का? अशी चर्चा आता होऊ लागली आहे.
उत्तर भारतीय सेना हा तोच राजकीय पक्ष आहे. ज्याने विधानसभेच्या निवडणुकीत लॉरेन्स बिश्नोई यांना तिकीट देण्याचा दावा केला होता.हे पोस्टर अंधेरी पश्चिम भागात लावण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान ही पोस्टर आता चर्चेचा विषय बनली आहे. कारण मुंबईत मोठ्या संख्येने उत्तर भारतीय राहतात. अंधेरी भागात उत्तर भारतीय नागरिकांची संख्या अधिक आहे, असं असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर लागवण्यात आलेले हे पोस्टर चर्चेत आले आहेत.