सुनील जाधव, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 16 जानेवारी 2024 : शिवसेना पक्ष कुणाचा अन् आमदार अपात्रता प्रकरणाचा नुकतंच निकाल आला. हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाजून लागला. यानंतर आता लढाई जनतेच्या कोर्टात अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज दुपारी 4 वाजता महा पत्रकार परिषद होणार आहे. या महापत्रकार परिषदेला ‘जनता न्यायालय’ असं नाव देण्यात आलं आहे. मुंबईतील वरळी एनएससीआय डोम इथं ही पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेची जय्यत तयारी सुरू आहे. वरळी भागात ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः पत्रकार परिषदेत संबोधित करतील. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित असतील. कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील रोहित शर्मा हे देखील उपस्थित असणार आहे. त्याच सोबत काही ज्येष्ठ विधिज्ञ, राजकीय विश्लेषक सर्व सामान्य जनता आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील वरळी डोम इथं उपस्थित असतील.
विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात घेतल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय आणि विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय यातील विसंगती कायदे तज्ञ समजून सांगतील अशी माहिती आहे. निकालातील ठळक आणि महत्त्वाचे त्रुटी असलेले मुद्दे या महापत्रकार परिषदेमध्ये समजून सांगणार आहेत. विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा कशा पद्धतीने ठाकरे गटाच्या बाबतीत चुकीचा आहे? हे आपल्या भूमिकेतून या पत्रकार परिषदेत सांगण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून केला जाईल.
उद्धव ठाकरेंची आज ‘जनता न्यायालय’ महा पत्रकार परिषद आहे. वरळी इथे ठाकरे पक्षाची तुफान बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. या परिषदेत कायदेपंडितही उपस्थित राहणार आहेत. 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात जो निकाल दिला. त्यावर आज उद्धव ठाकरे बोलणार आहेत.