मुंबई : घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. या मार्गावरील दोन स्थानके मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7 च्या टप्पा क्रमांक दोनशी जोडली गेल्याने मुंबई मेट्रो वनची ( घाटकोपर ते वर्सोवा ) प्रवासी संख्या वाढल्याने मेट्रो प्रशासनाने या मेट्रोच्या 18 फेऱ्या उद्या बुधवारपासून 1 फेब्रुवारीपासून वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई मेट्रो वनच्या रोजच्या फेऱ्यांची संख्या 398 इतकी होणार आहे.
मुंबईची पहिल्या मेट्रोची प्रवाशांची संख्या मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7 च्या संचलनाने वाढली आहे. घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रोच्या दोन स्थानकांची जोडणी मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7 च्या टप्पा क्रमांक दोनशी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. मेट्रोचे नवे नेटवर्क प्रवाशांना खुले झाल्याने प्रवाशांच्या वेळेत आणि रिक्षा तसेच टॅक्सी सेवेवर खर्च होणाऱ्या पैशात घसघशीत बचत झाली आहे.
या नव्या 18 फेऱ्यांच्या समावेशाने मुंबई मेट्रो वनच्या पिकअवरला आता दर चार मिनिटांऐवजी 3 मिनिट 40 सेंकद होणार आहे, त्यामुळे मध्य रेल्वेच्या घाटकोपरवरील होणाऱ्या गर्दीपासून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. तसेच नॉन पिकअवरला दर पाच ते आठ मिनिटाला एक फेरी धावणार आहे. मुंबई मेट्रो वन द्वारे दर महीन्याला सुमारे एक कोटी प्रवाशांची वाहतूक केली जाते तर दर दिवसाला या मेट्रो चार लाख प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याचे रिलायन्स इन्फ्राने मुंबई मेट्रो वनने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7 मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई मेट्रो वनच्या ( घाटकोपर ते वर्सोवा ) डी.एन.नगर आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ( WEH ) या स्थानकांच्या दैनंदिन प्रवासी संख्येत अनुक्रमे 8,000 आणि 6,000 ने वाढ झाल्याचा दावा मुंबई मेट्रो वन प्रशासनाने केला आहे. या दोन्ही मार्गावरील प्रवासी सकाळी घाटकोपरच्या दिशेने मेट्रो वनने प्रवास करतात आणि संध्याकाळी पुन्हा परत असतात; त्यामुळे अतिरिक्त प्रवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबई मेट्रो वनने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई मेट्रो वनची फेऱ्या वर्सोवा आणि घाटकोपर या दोन्ही स्थानकातून सकाळी 05.30 वाजल्यापासून सुरू होतात तर वर्सोवाहून शेवटची ट्रेन रात्री 11:20 वाजता आणि घाटकोपरहून शेवटची ट्रेन रात्री 11:45 वाजता सुटते असे मुंबई मेट्रो वनने म्हटले आहे.