अविनाश माने, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 15 डिसेंबर 2023 : पुढचे तीन दिवस मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे. कारण मुंबईत पाणी कपात केली जाणार आहे. मुंबईतील काही भागांत सोमवारी पाणीकपात होणार आहे. मुंबई महापालिकेच्या ब्रिटिशकालीन मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीसाठी तज्ज्ञ मंडळी जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहेत. मलबार हिल जलाशयातील कप्पा क्रमांक 1 ची अंतर्गत पाहणी करण्यात येणार आहे. या जलाशयाचा कप्पा क्रमांक 1 पूर्णपणे रिक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील महापालिकेच्या ‘ए’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘जी दक्षिण’ विभाग कार्यालयांच्या हद्दीतील काही भागात 18 डिसेंबर रोजी 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
येत्या सोमवारी मुंबईत पाणीकपात केली जाणार आहे. ‘ए’, ‘सी’, ‘डी’ आणि ‘जी दक्षिण’ विभागा अंतर्गत येणाऱ्या भागात पाणी कपात होणार आहे. सोमवारी म्हणजे 18 डिसेंबर रोजी 10 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा आणि वागळे इस्टेट (काही भागात) प्रभागसमितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बारवी जलशुद्धीकरण केंद्र जांभूळमध्ये तातडीचे दुरूस्तीचं काम करण्यात येत आहे. त्यामुळे आज (शुक्रवार) दुपारी 12 पासून रात्री 12 पर्यंत एकूण 12 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा मुंब्र्यातील प्रभाग 26 आणि 31 चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये तसंच वागळे इस्टेट प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरूनगर तसंच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गावइथल्या पाणीपुरवठा 12 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
मुंबई ठाण्यात पाणी कपात होणार आहे. त्यामुळे मुंबईकर आणि ठाण्यातील नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून हे आवाहन करण्यात आलं आहे.