मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबईत कोरोनाबाधितांचा विळखा वाढत आहे. यामुळे मुंबई महापालिकेकडून नवी नियमावली (Mumbai Weekend Lockdown) जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार, शनिवार, रविवारी विकेंड लॉकडाऊनदरम्यान कोणत्याही ग्राहकाला हॉटेलजवळ जाऊन पार्सल घेऊन जाता येणार नाही. फक्त ऑनलाईन किंवा फोनवरुन ऑर्डर देता येणार आहे. (Mumbai BMC Weekend Lockdown Guidelines)
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यानुसार दररोज रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू करण्यात आली आहे. तर दोन दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार येत्या शनिवार-रविवारी (10-11 एप्रिल) लॉकडाऊन असणार आहे.
या लॉकडाऊनदरम्यानच्या काही गाईडलाईन्स मुंबई महापालिकेकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार आता विकेंड लॉकडाऊनमध्ये रस्त्यावरील खाऊ गल्ल्या सुरु ठेवण्यात येणार आहेत. मात्र या ठिकाणी फक्त ग्राहकांना पार्सल मिळणार आहेत. तसेच एखाद्या रेस्टॉरंटमधूनही ऑनलाईन जेवण मागवता येणार आहे, याबाबतचे परिपत्रक मुंबई महापालिकेने जारी केले आहे.
त्याशिवाय मुंबईत अत्यावश्यक वस्तूंच्या ऑनलाईन डिलिव्हरी आठवड्याचे सातही दिवस 24 तास सुरु ठेवण्याची परवानगी पालिकेने दिली आहे. मुंबईत शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत मुंबईसह राज्यात सरकारने लॉकडाऊन जाहीर केला आहे. या दरम्यान फळविक्रेत्यांनाही व्यवसाय करता येणार आहे.
तसेच उपहारगृहांना त्यांचा व्यवसाय करता येणार आहे. मात्र यावेळी फक्त ऑनलाईन किंवा फोनवरुन ऑर्डर घेता येणार आहे. कोणत्याही ग्राहकांना उपहारगृहाजवळ जाऊन पार्सल घेण्याची परवानगी असणार नाही, असे महापालिकेने सुधारित आदेशात स्पष्ट केले आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. (Mumbai BMC Weekend Lockdown Guidelines)
तसेच लॉकडाऊनमध्ये विविध परीक्षांच्या उमेदवारांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यांनी सोबत प्रवेशपत्र बाळगणे गरजेचे आहे. तसेच, त्यांच्यासोबत एका व्यक्तीला प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या दोन दिवसातील लॉकडाऊनच्या काळात खासगी वाहनांना रस्त्यावर उतरण्यास बंदी करण्यात आली होती. त्याच बरोबर सार्वजनिक वाहतुकीतून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करता येणार होता. मात्र, आता त्यात परीक्षार्थी उमेदवारांनाचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच घरकाम करणाऱ्या महिला, चालक, वैयक्तिक परिचारिका, वैद्यकीय सहाय्यक, खानसामे यांनाही आठवड्याचे सातही दिवस सकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर चष्माच्या दुकानांनाही राज्य सरकारने ठरवून दिलेल्या वेळेत व्यवसाय करता येणार आहे, असेही या आदेशात म्हटलं आहे. (Mumbai BMC Weekend Lockdown Guidelines)
संबंधित बातम्या :
आशियातील सर्वात मोठ्या महापालिकेत नोकरीची संधी, एक मुलाखत आणि मुंबई महापालिकेत नोकरी पक्की