विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष लढणार? कोणत्या नेत्याच्या विरोधात कोणता नेता मैदानात असणार? याबाबत चर्चा होत आहे. अशातच वरळीत आदित्य ठाकरे विरूद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट बडा नेता मैदानात उतरवण्याची शक्यता आहे. तशी तयारी सुरु झाल्याचं दिसतं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाला जाण्याची दाट शक्यता आहे. ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवतील. जर असं झालं तर आदित्य ठाकरे विरूद्ध अमोल मिटकरी असा सामना होण्याची शक्यता आहे.
वरळीमध्ये पोस्टर लागले आहेत. यात अमोल मिटकरी यांच्या उमेदवारीचा उल्लेख करण्यात आला आहे. वरळी विधानसभेवर पुन्हा घड्याळ… वरळीतील संभाव्य उमेदवार अमोल मिटकरी यांना शुभेच्छा, असे पोस्टर वरळीत लागले आहेत. प्रखर वकृत्व शासनावर पकड अशी त्यांची ओळख… वरळीकरांची पसंत घड्याळ, सामान्य माणसांची पसंत घड्याळ, हीच ती पुन्हा घड्याळ – घड्याळ, असंही पोस्टरवर म्हणण्यात आलं आहे. अजित पवार गटाच्या स्थानिक कार्यकर्त्यांकडून हे पोस्टर लावण्यात आले आहेत.
2019 पहिल्यांदाच ठाकरे घरातील व्यक्तीने निवडणूक लढली होती. 2019 ला शिवसेनेकडून वरळीतून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या आदित्य ठाकरेंनी ही निवडणूक जिंकली होती. आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश माने यांच्यात ही लढत झाली होती. सुरेश माने यांना 21 हजार 821 मतं मिळाली होती. तर आदित्य ठाकरेंना 89 हजार 248 मतं मिळाली होती. 67,427 मतांनी आदित्य ठाकरेंनी ही निवडणूक जिंकली होती.
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महायुती विरूदध महाविकास आघाडी असा सामना राज्यभरात रंगणार आहे. अशातच मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातही असाच सामना होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून आदित्य ठाकरे मैदानात असतील तर महायुतीकडूनही तगडा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. अमोल मिटकरींना उमेदवारी दिली तर आदित्य ठाकरे विरूद्ध अमोल मिटकरी असा सामना होण्याची शक्यता आहे.