प्रवाशांना नियमबाह्य भाडे आकारणे, भाडे नाकारणे तसेच गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा – टॅक्सी तसेच ओला -उबर चालकांच्या तक्रारीसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकच व्हाट्सअप नंबर प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रवाशांनी आपल्या गैरसोयबाबत या नंबरवर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. ते वांद्रे पूर्व मतदार संघातील बांद्रा, खार व इतर रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा व टॅक्सी चालकांच्या अरेरावी संदर्भात बोलवलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी वांद्रे पूर्व भागाचे लोकप्रतिनिधी वरुण सरदेसाई व मोटार परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई यांनी बांद्रा, खार अंधेरी या रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना रिक्षा व टॅक्सी चालकांची अरेरावी सहन करावी लागते. हे चालक नियमबाह्य पद्धतीने भाडे आकारतात. गैरवर्तन करतात, तसेच अनेक प्रवाशांना इच्छित स्थळी सोडण्यास नकार देतात. या संदर्भात परिवहन विभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली. या वेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, मोटार परिवहन विभाग व वाहतूक पोलीस यांनी मिळून एक संयुक्त पथक नेमावे. ज्या भागात अशाप्रकारे प्रवाशांना रिक्षा चालकाकडून त्रास होतो, तेथे वारंवार गस्त घालावी.
सध्या अंधेरी प्रादेशिक विभागासाठी ९९२०२४०२०२ हा व्हाट्सअप क्रमांक प्रदर्शित करण्यात आला आहे. तथापि, प्रादेशिक विभाग निहाय व्हाट्सअप हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित न करता पुर्ण मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकच व्हाट्सअप एका आठवड्यात प्रदर्शित करावा आणि त्याला व्यापक प्रसिद्धी द्यावी. जेणेकरून प्रवासी आपल्या तक्रारी संबंधित व्हाट्सअप नंबर वर करतील. तक्रार असलेल्या रिक्षा अथवा टॅक्सी चालकाला परिवहन विभागाने नोटीस पाठवणे आवश्यक आहे. या तक्रारीची गंभीरता लक्षात घेऊन गरज पडल्यास त्याचा परवाना देखील रद्द करण्याची कारवाई करावी, असे निर्देश परिवहन विभागाला मंत्री सरनाईक यांनी दिले आहेत.
गेली कित्येक वर्ष रखडलेले चिपळूण बसस्थानकाचे काम एप्रिल महिन्यात सुरू होईल! अशा प्रकारचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले. ते एस.टी.महामंडळाच्या विविध प्रश्न संदर्भात बोलावलेल्या बैठकीमध्ये बोलत होते. यावेळी अन्न आणि औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे तसेच आमदार शेखर निकम, आमदार सुहास बाबर, आमदार राणा जगजितसिंग पाटील व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह एसटीचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.