मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : गेले तीन दिवस मुंबईतील हवेची गुणवत्ता अतिशय खराब झाली आहे. केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारी नूसार वांद्रे येथील एअर क्लालिटी इंडेक्स 210 नोंदविला गेला आहे. मालाड पश्चिम येथील एअर क्वालिटी इंडेक्स 229 नोंदविला आहे. त्यामुळे मुंबईतील हवेचा दर्जा अतिशय खराब झाली असून मुंबईकरांनी घराबाहेर पडताना तसेच घरातही श्वसनाचे विकार होऊ नये काळजी घ्यावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील एका जनहित याचिकेवर संबंधित यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत.
पंधरवड्यापूर्वी मुंबईतील हवेचा दर्जा दिल्ली महानगराहून अधिक खराब झाला होता. आता गेले तीन दिवस एअर क्वालिटी इंडेक्सनूसार मुंबईतील हवा अतिशय खराब झाली आहे. चकाला-अंधेरी पूर्व येथील एअर क्वालिटी इंडेक्स 246 नोंदवला गेला असून त्यानूसार या विभागातील हवा अतिशय खराब झाल्याचे म्हटले जात आहे. तर माझगाव येथील एअर क्वालिटी इंडेक्स 207 नोंदवला असून बोरीवली पूर्व आणि वरळी येथे 144 असा मॉडरेट ( मध्यम स्वरुपाचा ) एअर क्वालिटी इंडेक्स नोंदविला गेला आहे.
मुंबईत सलग तीन दिवस हवेची गुणवत्ता ढासळली आहे. स्विस एअर मॉनिटर IQAir च्या आकडेवारीप्रमाणे सोमवारी दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांचा जगातील सर्वाधिक प्रदूषित दहा शहरात समाविष्ठ झाली आहे. टॉप टेन प्रदुषित शहरात दिल्ली चौथ्या, मुंबई सातव्या आणि कोलकाता दहाव्या क्रमांकावर आहे.
हवेची गुणवत्ता वाऱ्याच्या वेगाने हळूहळू सुधारण्याचा अंदाज असला तरी ज्यांना दम्याचा त्रास, किंवा श्वसनाचा विकार आहे त्यांनी अधिक काळजी घ्यावी असे म्हटले जात आहे. मुंबईकरांना घराबाहेर पडताना काळजी घ्यावी मास्क घालावा, घरात एअर प्युरिफायर सुरु करावे असे आयक्यएअरने म्हटले आहे.
मुंबई महानगर पालिकेने 21 ऑक्टोबर रोजी मुंबईतील बांधकाम सुरु असलेल्या साईटवर पाण्याचे फवार मारून धुळ उडू नये याची काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जर आवश्यक प्रतिबंधात्मक पाऊले उचलली नाही तर बांधकाम थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कन्स्ट्रक्शन साईटवर हिरव्या जाळ्या लावाव्यात किंवा ज्यूटची जाळी लावावी. अॅण्टी स्मोक गनचा बांधकाम स्थळी वापर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील टाटा पॉवर प्लांट आणि आरसीएफ प्लांट कडून प्रदूषणाच्या नियमांचे पालन होत आहे की नाही याचीही खातरजमा प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पालिका करीत आहे.