मुंबई | 6 नोव्हेंबर 2023 : मुंबईच्या डब्बेवाल्यांचे मॅनेजमेंटचे कौतूक जगभरात केले जाते. ऊन्हाळा असो कि पावसाळा मुंबईच्या डब्बेवाल्यांचा डब्बे वेळेत आणि योग्य जागी पोहचविण्याचे गणित कधीच चुकत नाही. मुंबईचे डबेवाले लोकलच्या ट्रेनच्या मालडब्यातून आपल्या डोक्यावरील डब्यांचा भार वाहून प्रवास करीत असतात. त्यांच्या डबे वेळीत पोहचविण्याच्या मॅनेजमेंटमुळे ब्रिटनच्या राजपुत्राने देखील त्यांचे कौतूक केले होते. अशा मुंबईच्या डबेवाल्यांनी आता सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईचे डबेवाले दिवाळीच्या सणासाठी सुट्टीवर जात आहेत. ते चार दिवस दिवाळी निमित्त आपल्या गावी जाणार आहेत. त्यामुळे त्यांनी ही सुट्टी घेतली असल्याचे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले.
मुंबईच्या डबेवाल्यांचा वक्तशीरपणा कौतूकाचा विषय असतो. घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांच्या पोटाची काळजी घेणारे डबेवाले आता चार दिवस सुट्टीवर चालले आहेत. त्यामुळे चार दिवस मुंबईकरांना या दिवसात आपल्या घरातील गरमागरम जेवणाला मुकावे लागणार आहे. मुंबईचे डबेवाले कामगार आपल्या गावी दिवाळी निमित्त चालले आहेत. बहुतांश डबेवाले मावळ प्रातांतील आहेत. पुणे, रायगड, नगरच्या आजूबाजूच्या गावातून ते रोजगारासाठी मुंबईत येत असले तरी त्यांची गावाशी नाळ कायम आहे. त्यामुळे ते सुटीला सण साजरा करायला जात असतात. डबेवाले कामगार दिवाळी निमित्त सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर ते गुरुवार 16 नोव्हेंबर असे चार दिवस सुट्टीवर चालले आहेत. या चार दिवसात दोन शासकीय सुट्ट्या आहेत. दिनांक 17 नोव्हेंबर शुक्रवारपासून डब्बेवाले आपल्या नेहमीच्या वेळा कामावर रुजू होतील असे डबेवाल्यांच्या युनियनचे नेते सुभाष तळेकर यांनी कळविले आहे.
कोव्हीड साथीच्या वेळी कोरोनाकाळात लॉकडाऊन जाहीर झाले त्यावेळी सरकारने जारी केलेल्या निर्बंधामुळे इतर सर्व घटकांप्रमाणे डबेवाल्यांच्या व्यवसायलाही जोरदार फटका बसला. वर्कफ्रॉम होममुळे व्यवसायावर गदा आली. त्यामुळे अनेक डबे बंद झाल्याने या व्यवसायाची घडी विस्कटली. व्यवसाय कमी होऊ लागल्याने डबेवाल्यांनी रोजगाराच्या दुसऱ्या मार्गांकडे वळले. काही डबेवाले मात्र ही सेवा व्रत मानून कमी उत्पन्न मिळत असतानाही डबे पोहचविण्याचे काम चिकाटीने करीत आहेत. त्यामुळे दिवाळी सणानिमित्त ग्राहकांनी डबेवाल्यांना एका महिन्याचा जादा पगार दिवाळी बोनस म्हणून खुशीने द्यावा. तसेच या चार दिवसांच्या सुट्टीचा पगार देखील ग्राहकांनी कापू नये असे आवाहन सुभाष तळेकर यांनी केले आहे.