घाटकोपर ते वर्सोवा या मुंबईतील पहिल्या मुंबई वन मेट्रो ( Mumbai Metro One ) मार्गिकेला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मुंबई मेट्रो वनने आपल्या सेवेची 10 वर्षे पूर्ण केली आहेत. या दहा वर्षात 970 दशलक्ष प्रवासी ( 97 कोटी ) प्रवाशांची वाहतूक मुंबई मेट्रो वनने केली आहे. मुंबई मेट्रो वन हा पहिला खाजगी आणि सार्वजनिक सहभागातून तयार केलेला पीपीपी प्रकल्प आहे. या मार्गिकेला बांधण्यासाठी 4,321 कोटी रुपये खर्च आला आहे. एकूण 11.40 किमीचा आणि 12 स्थानके असलेला हा मार्ग पूर्व उपनगराला पश्चिम उपनगराशी जोडतो. त्यामुळे या मार्गाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा बांधण्यासाठी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या खाजगी कंपनीची एमएमआरडीएने मदत घेतली होती. या प्रकल्पात रिलायन्सचे 69 टक्के शेअर आहेत. तर एमएमआरडीचे 26 टक्के आणि 5 टक्के शेअर वेओलिया ट्रान्सपोर्टचे आहेत. मुंबई मेट्रो वन 8 जून 2014 रोजी सुरु झाली होती. मुंबई मेट्रो वन मार्गिकेने सध्या दिवसाला 418 फेऱ्यांद्वारे दररोज 4.5 लाख प्रवाशांची वाहतूक करत आहे. सुर्याचे पृथ्वीपासून चे अंतर तब्बव 14.9 कोटी किमी आहे आणि मुंबई मेट्रो वनने 10 वर्षात 12.6 कोटी किमीचे रनिंग पूर्ण करीत विक्रम केला आहे !
मुंबई मेट्रो वनचे प्रवासी असे वाढले चौकटीत पाहा –
वर्ष | सोमवार ते शुक्रवार प्रवासी संख्या | कोरोना काळात मर्यादित सेवा |
---|---|---|
2014 | 2.75 लाख | |
2015 | 2.85 लाख | |
2016 | 3.35 लाख | |
2017 | 3.80 लाख | |
2018 | 4.30 लाख | |
2019 | 4.50 लाख | |
2020 | 0.72 लाख | कोरोना काळ निर्बंध |
2021 | 1.35 लाख | कोरोना काळ निर्बंध |
2022 | 3.50 लाख | |
2023 | 4.50 लाख |
पहिला ईस्ट ते वेस्ट कॉरिडॉर असलेल्या घाटकोपर ते वर्सोवा मुंबई मेट्रो वनने प्रवासी सेवेचे दशक पूर्ण केले आहे. या 10 वर्षात 970 दशलक्ष प्रवासी मुंबई मेट्रोला लाभेल आहेत. आतापर्यंत 97 कोटी प्रवाशांनी 11 लाख फेऱ्यांद्वारे 99% पंक्च्युअल्टी पाळत ही सेवा दिली आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने मुंबईच्या पहिल्या मेट्रो मार्गाला बांधण्यासाठी भांडवल पुरविले आहे. हा मार्ग मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकांशी कनेक्टेट असल्याने घाटकोपरच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे.
दहा वर्षांत मुंबई मेट्रो वनने आपल्या ताफ्यातील 16 ट्रेनद्वारे 97 कोटी प्रवाशांची वाहतूक तर केलीच आहे. शिवाय दहा वर्षात मुंबईच्या या पहिल्या मेट्रोने 12.6 कोटी किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. म्हणजे एका ट्रेनने सरासरी 9.7 किमीचा प्रवास केला आहे. घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱ्या या मुंबई मेट्रो वनच्या ट्रेनला केवळ चारच डबे आहेत. गर्दी वाढल्याने हे डबे अपुरे पडत आहेत. त्यामुळे या ट्रेनच्या डब्यांची संख्या वाढवावी आणि तसेच सुटीच्या दिवशी फेऱ्या वाढवाव्यात आणि दोन ट्रेनमधील वेळ कमी करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.
पश्चिम रेल्वेच्या मार्गावर पालघर यार्डात मालगाडी घसरल्याचा अपघात झाला तेव्हा नवीन मेट्रो मार्ग 2 अ आणि मेट्रो – 7 च्या बोरीवली, कुरार आणि राष्ट्रीय उद्यान या स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती, त्यावेळी एमएमआरडीएच्या महा मुंबई मेट्रोने अतिरिक्त मेट्रो ट्रेन चालवून प्रवाशांना दिलासा दिला होता. मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 7 ने देखील नुकताच एकाच दिवसात सर्वाधिक 2, 60,471 प्रवासी संख्येचा टप्पा गाठला असल्याचे ट्वीट केले आहे.
सध्या मुंबईत पहिला आणि देशातील पहीला पीपीपी प्रकल्प असलेला घाटकोपर ते वर्सोवा मुंबई मेट्रो वन मार्ग, पश्चिम उपनगरातील दोन नवीन मेट्रो मार्ग 2 अ आणि मेट्रो – 7 मार्ग , देशातील पहिला चेंबूर ते सात रस्ता मोनोरेल मार्ग आणि होऊ घातलेला पहिला भूयारी मेट्रो कुलाबा-बीकेसी-सिप्झ मेट्रो – 3 असे तीनच मार्ग नजिकच्या काळात सेवा देऊ शकणार आहेत. मुंबई मेट्रो 4 (अ ) वडाला ते कासारवडवली साल 2026 रोजी सुरु होऊ शकतो असे सांगितले जात आहे. देशाची आर्थिक राजधानी असूनही मुंबईत मेट्रो मार्गिका सुरु होण्यास खूपच वेळ लागला. मुंबईत जागांचे भाव आणि दाट लोकवस्ती त्यामुळे अन्य शहराच्या तुलनेत मुंबईत एलिवेटेड मेट्रो मार्ग बांधणेही अवघड असल्याचे म्हटले जात आहे.
सध्या मुंबई मेट्रो वन मार्गिकेवर दररोज सोमवार ते शुक्रवार या दिवशी 418 मेट्रो फेऱ्या चालविल्या जात असून पिकअवरला दर 3.5 मिनिटाला तर नॉन पिकअवराला दर 7 मिनिटांना एक ट्रेन चालविला जात आहे. परंतू नॉन पिक अवरला कधी-कधी दहा मिनिटांने एक ट्रेन सुटते त्यामुळे स्टेशनवर रांगा लावाव्या लागतात. ट्रेन लगेच सुटते त्यामुळे प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो असे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितले.