मुंबई | 14 फेब्रुवारी 2024 : अशोक चव्हाण… राज्याच्या राजकारणातील महत्वाच्या नेत्यांमधील एक नेते… राज्याच्या राजकारणाची जेव्हा चर्चा होते. तेव्हा तेव्हा अशोक चव्हाण यांचं नाव आघाडीवर असतं. पण तुम्हाला माहिती आहे का, अशोक चव्हाण यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात कॉलेजच्या दिवसातच झाली होती. शिवाय पत्नी अमिता चव्हाण यांनाही अशोक चव्हाण यांनी कॉलेजच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि त्यांना निवडणूकही आणलं. तो किस्सा नेमका काय आहे? आज व्हॅलेंटाईन डे निमित्त अमिता आणि अशोक चव्हाण यांच्या लव्हस्टोरीतील तो किस्सा जाणून घेऊयात…
नांदेडमध्ये रितेश देशमुख यांनी अमिता आणि अशोक चव्हाण एक मुलाखत घेतली होती. या कार्यक्रमात अशोक चव्हाण यांनी तो किस्सा सांगितला होता. कॉलेजमध्ये असताना अशोक चव्हाण हे विद्यार्थी प्रतिनिधी होते. त्याच वेळी अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता त्यांच्यासोबत कॉलेजमध्ये होत्या. तेव्हा त्यांनी अमिता यांना कॉलेजमधील निवडणुकीला उभं केलं आणि त्यांना निवडून आणलं.
अशोक चव्हाण हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र… त्यामुळे त्यांना भेटताना मनावर दडपण होतं का? असा प्रश्न रितेशने अमिता यांना या मुलाखती दरम्यान विचारला. तेव्हा अमिता म्हणाल्या, की अशोकजींना भेटताना थोडं दडपण तर होतंच… कारण मी वेगळ्या धर्मातून येते. ते वेगळ्या धर्मातून येतात. दोघांच्या घरचं वातावरण वेगळं होतं. एखाद्या मुख्यमंत्र्याचा मुलगा कसा असतो याचा एक अंदाज असतो. तसं माझंही होतं. मात्र जेव्हा त्यांना भेटले. त्यांच्या घरच्यांना भेटले. तेव्हा मात्र विश्वास आला की मी यांच्यासोबत राहू शकते. अशोकजींचा स्वभाव त्यांचा खरेपणा पाहिला. तेव्हा ते दडपण निघून गेलं, असं अमिता चव्हाण यांनी सांगितलं.
व्हॅलेंटाईन डे हा काही एक दिवशी साजरा केला जात नाही. आम्हा दोघांसाठी प्रत्येक दिवस व्हॅलेंटाईन डे असतो. आता एकमेकांना गुलाब वगैरे देत नाही. तर एका नजरेनं एकमेकांना बघतो आणि मनात काय चाललंय हे कळतं, अमिता चव्हाण यांनी एका मुलाखतील सांगितलं.