केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. बाळासाहेब गेले त्यानंतर त्यांचे रुद्राक्ष याच उद्धव ठाकरेंनी फेकून दिले, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केला आहे. मला मातोश्रीमधील सगळं माहिती आहे, मी अजून सांगितलेलं नाही. बाळासाहेबांनी माझ्याकडून शब्द घेतला होता म्हणून मी शांत आहे. मी कुठल्याच ठाकरेंबद्दल वाईट काही करणार नाही असं बाळासाहेबांना सांगितलं होतं, म्हणून मी शांत आहे, असा सूचक इशाराही नारायण राणे यांनी दिला आहे.
दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या या भाषणाचा समाचार घेण्यासाठी नारायण राणे पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. भाजपला तडीपार करण्याची भाषा उद्धव ठाकरे यांनी केली. आमची देशात आणि राज्यात सत्ता आहे. ज्यांनी कोरोना काळात पैसा खाल्ला त्यांना आम्ही तडीपार करू. उद्धव ठाकरे यांची मानसिकस्थिती बिघडली आहे. तुझी लायकी आहे काय? अशा ऐकेरी उल्लेख करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ऐकेरी भाषेतच टीका केली. आम्ही तुला दिलेला भ्रष्ट पैसा नव्हता काय? कोरोना काळात काही माध्यमांची आर्थिक स्थिती ढासळली होती. पण सामना नफ्यात होता. काळा पैसा पांढरा करण्याचं हे काम आहे. कोरोनाकाळात मोदींनी 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिलं, असंही राणे म्हणाले.
आम्ही त्यांच्यासोबत मंदिरात जायचो तेव्हा त्याच्यावतीने मीच पैसे द्यायचो, असा खोचक टोला राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. भाजप ठगांचा पक्ष आहे. मग वर्षानुवर्षे आमच्या सोबत राहिल्याने तू पण ठग झालास का? असा सवालच त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस नुकतेच लडाखला जाऊन आले. फडणवीस पक्ष सांगेन तिथं जाऊन येतात. फडणवीसांनी तुम्हाला पाच वर्षे सांभाळलं, ते कसं हे मला माहीत आहे, असंही ते म्हणाले.
रामलीला मैदानावर उद्धव कुठली लीला दाखवायला गेले होते? लोकसभेनंतर संजय राऊत देखील तिकडे राहणार नाहीत. जेव्हा राज्यसभेत मी संजय राऊतांना भेटायचो, तेव्हा ते मातोश्रीत आणि इतर ठिकाणी काय चाललंय ते सगळं सांगायचे, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. संजय राऊत पक्षाशी प्रामाणिक नाहीत. शिवसेना संपविण्यात राऊतांचा हात आहे, असंही ते म्हणाले.