राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नरहरी झिरवळ यांचे पुत्र गोकुळ झिरवळ हे शरद पवार गटात प्रवेश करतील आणि निवडणूक लढतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. गोकुळ झिरवळ यांनी जयंत पाटील यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आता त्यावर विधानसभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच शरद पवार यांचं कौतुकही केलं आहे. शरद पवार हे आमच दैवत आहे आणि ते साहेब आहेत. त्यामुळे ते कोणाला उभं करत आहेत, हे अम्हाला माहीत नाही. त्यासंदर्भात आम्ही काही बोलणार नाही, असं झिरवळ म्हणाले.
गोकुळ झिरवळ हा माझा मुलगा आहे. त्यामुळे आमच्या घरात कुठलीही फूट पडणार नाही. गोकुळला आमदार व्हायचं नाहीये. शिवस्वराज्य यात्रा ही माझ्या मतदार संघात आली होती. तेव्हा गोकुळचे शरद पवार यांच्या स्वागताचे बॅनर लागले होते. तेव्हा मी गोकुळ ला विचाराल तुला आमदारकी लढाईची आहे का? तेव्हा त्याने मला नाही असं सांगितलं. त्यामुळे गोकुळ हा माझ्यासोबत आहे, असं स्पष्टीकरण नरहरी झिरवळांनी दिलं आहे.
भाजप आणि शिंदे गट अजित पवार गटाला महायुतीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावर झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांना महायुती मधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात आमचे वरिष्ठ नेते बोलतील, असं झिरवळ म्हणाले.
आरक्षणाच्या मुद्द्यावरही नरहरी झिरवळ यांनी भाष्य केलंय. आदिवासी समाजाच्या संरक्षणसाठी आज आम्ही सर्व जण एकवटणार आहोत आणि बैठक घेऊन याचा विरोध करणार आहोत. धनगर आणि धनगड हे दोन्ही वेगळे आहेतस असा निर्णय कोर्टाने दिला आहे. यासंदर्भात न्यायालयात लढाई सुरू आहे. आम्ही आज बैठक घेऊन पुढील रणनीती कशी असणार हे ठरवणार आहोत, असं झिरवळांनी म्हटलं आहे.