मुंबई: नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळूनही काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. या उलट त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सत्यजीत तांबे यांना भाजपची फूस असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे नाशिक पदवीधरची निवडणूक एकतर्फी होण्याची वा बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. नाशिक पदवीधरची निवडणूक बिनविरोध होणार नाही, असं संजय राऊत यांनी ठणकावलं आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणुकीत शिवसेना मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हे संकेत दिले. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यासाठी काँग्रेसला दोष देण्यात अर्थ नाही. पण नाशिक पदवीधरची निवडणूक बिनविरोध होणार नाही. आम्ही मातोश्रीवर भेटणार आहोत. त्यात निर्णय घेऊ.
महाविकास आघाडीचे आम्ही सर्व नेते निर्णय घेणार आहोत, असं संजय राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे नाशिक पदवीधरची निवडणूक एकतर्फी होणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
महाविकास आघाडीचं राज्यात सरकार होतं. कॉमन मिनिमम प्रोग्रामवर हे सरकार आम्ही चालवलं. त्यात उत्तम समन्वय होता. ज्या पद्धतीने सरकार चालवलं तोच समन्वय तोच एकोपा हा विरोधी पक्षात असतानाही असायला हवा. तरच आपण पुढील लढाया जिंकू शकतो.
ही भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. विधान परिषद निवडणुकीत जो गोंधळ झालाय तो झालाच आहे. तो नाकारू शकत नाही. काँग्रेसबाबत ती घटना घडली असली तरी त्याकडे महाविकास आघाडी म्हणून पाहिलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
पाच जागांसाठी एकत्र बसून चर्चा व्हायला हवी होती. पण ते झाल्याचं दिसत नाही. मी कुणाला दोष देत नाही. नागपूर, अमरावतीबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्यायला हवा होता. अमरावतीत काँग्रेसकडे उमेदवार नव्हता. त्यांनी आमचा उमेदवार घेतला.
मग आम्हालाच का उमेदवारी दिली नाही? असा सवाल करतानाच आम्ही लढलो असतो. आमचे बुलढाण्याचे जिल्हाप्रमुख लिंगाडे यांनी तयारी केली होती. तुम्ही त्यांनाच तिकीट दिलं. पण ते आमच्याकडून लढले असते तर आम्ही अधिक जोमाने लढलो असतो, असंही त्यांनी सांगितलं.
नाशिकमध्ये जो घोळ झाला त्यावर कुणालाच दोष देता येत नाही. अशा प्रकारच्या उलट्यापालट्या सर्वच पक्षात होत असतात. तांबे कुटुंब हे परंपरागत काँग्रेसचं निष्ठावंत कुटुंब आहे. त्यांच्यावर कुणी अविश्वास कसं दाखवणार? असा सवाल त्यांनी केला.
तांबेंनी काय निर्णय घेतला हे त्यांच्या नेतृत्वाला माहीत नसेल तर त्याला काय करणार? राहुल गांधी तांबे यांच्या घरी राहिले होते. अशा कुटुंबावर अविश्वास कसा दाखवणार? त्यांच्या डोक्यात काय चाललंय? भाजपने काय गुप्तपणे कारवाया केल्या?
हे प्रत्येकवेळी समजतं असं नाही. त्यामुळे काँग्रेसला दोष देणार नाही. आम्हीही अशा प्रकाराला सामोरे गेलो आहोत. पण भविष्यात समन्वय ठेवला तर असे प्रसंग होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
जसं प्रकाश आंबेडकरांची आमच्यासोबत चर्चा सुरू आहे, ती लपून राहिली नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आम्ही माहिती देत असतो. त्यातून जो निकाल लागेल तो लागेल. पण आम्ही मित्र पक्षांना माहिती देत असतो, असंही त्यांनी सांगितलं.