शरदचंद्र पवार पक्ष भिवंडी खासदार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हे त्यांच्यासोबत होते. त्यामुळे बाळ्यामामा म्हात्रे हे शरद पवारांची साथ सोडणार का? या चर्चेने राजकीय वर्तुळ व्यापून टाकलं. असं असतानाच बाळ्यामामा म्हात्रे यांनी राजधानी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा आपण शरद पवार यांच्यासोबतच असल्याचं बाळ्यामामा म्हात्रे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीबाबतही त्यांनी खुलासा केला आहे.
धनंजय मुंडे आणि बाळ्यामामा म्हात्रे यांनी मुंबईतील सागर बंगल्यावर जात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली. ही भेट नेमकी कशासाठी घेतली? याचं कारण स्वत: बाळ्यामामा म्हात्रे यांनी माहिती दिली आहे. काल दुपारी मी देवेंद्र फडणवीस यांना वैयक्तिक कामासाठी भेटलो. राजकीय विषय काहीही नव्हता. राजकीय विषय असेल तर दुपारी 2 वाजता गाडी घेऊन कोण जाईल का?, असं बाळ्यामामा म्हात्रे यांनी म्हटलं आहे.
बाळ्यामामा म्हात्रे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर बाळ्यामामा म्हात्रे हे शरद पवार यांची साथ सोडणार का? याबाबत चर्चा होऊ लागली. पण बाळ्यामामा म्हात्रे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. मी कोणाशीही भेटलो नाही. मीडियाने वेगवेगळे तर्क लावले आहेत. एकमेकांना भेटतो म्हणजे राजकारण असतं असं नाही. मी खासदार आहे आमदार देखील नाही. शरद पवार यांना सोडण्याचा काही प्रश्नच नाही. मी त्यांच्याच पक्षात आहे, असंही बाळ्यामामा म्हात्रे म्हणालेत.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत बाळ्यामामा म्हात्रे यांनी भाजपचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा पराभव केला होता. भिवंडीत बाळ्यामामा म्हात्रे आणि भाजपमध्ये झालेला राजकीय संघर्ष सर्वांनी पाहिला. पण आता शपथविधीसाठी अवघे काही तास शिल्लक असताना बाळ्यामामा यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता म्हात्रे यांनी स्वत : याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.