नवी मुंबई : नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai Airport) नामकरणावरुन राजकारण पेटलं होतं. स्थानिकांनी लोकनेते दि. बा. पाटील (D B Patil Navi Mumbai) यांच्या नावाचा आग्रह धरला होता. दरम्यान मुंबई- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचेच नाव देण्याचा निर्णय झाला आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नावाबाबत होकार दिला आहे. बाळासाहेबांचे नाव मी दिलं नाही, असंही ते म्हणालेत. दि बा पाटील (D. B Patil) यांच्या नावाला माझा कुठलाही विरोध नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी या नावावर शिक्कामोर्तब केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांसमोर याबाबत माहिती दिली. प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी दि. बा. पाटलांच्या नावाची मागणी केली होती. ही त्यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. कोण आहेत दि. बा.पाटील? त्यांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्त आग्रही का आहेत? बघुयात…
दि. बा. पाटील यांचे पूर्ण नाव दिनकर बाळू पाटील. त्यांचा जन्म उरण तालुक्यातील जासई येथे 13 जानेवारी 1926 रोजी झाला. ते पेशाने वकील होते. तर त्यांचे वडील शेतकरी आणि शिक्षक होते. पनवेलचे नगराध्यक्ष, चार वेळा आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शेतकरी कामगार पक्षातून झाली होती. त्यांनी शेतकऱ्यांची अनेक आंदोलने उभारली. प्रसंगी तुरुंगवासही भोगला. शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शिवसेनेतही प्रवेश केला होता. नवी मुंबईतील अनेक विकास कामात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. त्यांनी अनेक नेते आणि कार्यकर्तेही घडवले आहेत.
सिडकोकडून नवी मुंबईची उभारणी केली जात होती. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. पण योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती. शेतकऱ्यांच्या या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी दिबांनी मोठा लढा उभारला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला होता.
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह सुरुवातीपासूनच प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता आणि राजकीय पक्षाचे नेते करीत आले आहेत. कारण दि. बा. पाटील यांची नवी मुंबई ही कर्मभूमी आहे. इथल्या भूमिपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संबंध आयुष्य वेचलं आहे. 1984 साली शेतकऱ्यांच्या जमितीला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आणि देशभर गाजलेल्या लढ्यातून शेतकऱ्यांना साडेबारा टक्के विकसित जमीन देण्याचे तत्त्व जे प्रस्थापित झाले ते पुढे संबंध महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लागू झाले. त्यामुळे दि. बा. पाटील हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे व प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते मानले जातात
दि. बा. पाटील यांचंच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देण्यासाठी सर्व प्रकल्पग्रस्त सरसावलेले पाहायला मिळत आहेत. प्रत्येक गावात, रस्त्यावर ठिकठिकाणी त्यांच्या नावाचे बॅनर लावण्यात आले आहेत. कोळी बांधवांकडून वाशी खाडीमध्ये होडीवर बॅनरबाजी करण्यात आली.
पाचवेळा आमदार, दोन वेळा खासदार, विरोधी पक्षनेते, नगराध्यक्ष अशी दि. बा. पाटील यांची कारकिर्द राहिली आहे. त्यांनी आमदार आणि खासदार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्यानंतर ओबीसी समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा प्रश्न अशा अनेक लढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेऊन तुरुंगवासही भोगला. त्यामुळे त्यांचं कार्य नव्या पिढीला स्फूर्तिदायी ठरावं यासाठी त्यांच्या कर्मभूमीत त्यांची स्मृती जागरूक राहावी म्हणून नवी मुंबईत होत असलेल्या विमानतळाला त्यांचंच नाव द्यावं, अशी मागणी होत आहे.