नवी मुंबई : स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी डोळे लावून बसलेल्या नवी मुंबईतील ‘सिडको’च्या अर्जदारांसाठी खुशखबर आहे. सिडकोच्या नऊ हजार 249 घरांसाठी येत्या 26 नोव्हेंबरला लॉटरी (Navi Mumbai CIDCO Lottery) निघणार आहे.
दोन लाख घरांपैकी पहिल्या टप्प्यात जाहीर करण्यात आलेल्या नऊ हजार 249, तसेच बांधून तयार असलेल्या स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील शिल्लक 800 घरांसाठी एकूण 83 हजार ग्राहकांचे अर्ज ‘सिडको’कडे जमा झाले होते. मंगळवारी रात्री 11 वाजून 59 मिनिटांनी ऑनलाईन सोडत प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत संपली. अखेरच्या दिवशीच जवळपास दहा हजार अर्ज जमा झाले होते.
गेल्या वर्षी 14 हजार घरांसाठी ‘सिडको’कडे एक लाख 81 हजार मागणी अर्ज आले होते. या सर्व घरांची सोडत 26 नोव्हेंबर रोजी काढली जाणार आहे.
आरोपी म्हणतो जामीन द्या, वर्षभर फेसबुक वापरणार नाही
सिडको गृहप्रकल्पांचा 95 हजार घरांचा आराखडा तयार आहे. याशिवाय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या काही जागांवर सिडको आणखी एक लाख दहा हजार घरे बांधण्याच्या तयारीत आहे. अशा दोन लाख दहा हजार घरांचा निर्णय येत्या पाच वर्षांत पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन लाख घरांच्या महागृहनिर्मितीतील पहिला टप्पा नऊ हजार 249 घरांचा असून त्यांची सप्टेंबरमध्ये ऑनलाइन सोडत प्रक्रिया सुरु करण्यात आली होती.
स्वप्नपूर्तीच्या शिल्लक घरांसाठी 26,389 तर नवीन गृहप्रकल्पातील घरांसाठी 67,875 अर्ज प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षी सिडकोच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या 15 हजार घरांच्या योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. एक लाख 81 हजार अर्ज प्राप्त (Navi Mumbai CIDCO Lottery) झाले होते.