नवी मुंबई : कामोठे येथे बेदरकार स्कोडा चालकाने सहा जणांना उडवलं. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. नवी मुंबईच्या कामोठे सेक्टर-6 मध्ये रविवारी (22 जुलै) सायंकाळी हा अपघात घडला. या भीषण अपघाताची हेलावून टाकणारी दृष्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
कामोठे सेक्टर-6 मध्ये रविवारी एका स्कोडा गाडीने रस्त्यावरील पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. रयत शिक्षण संस्थेच्या शाळेजवळ सरोवर हॉटेलसमोरुन ही स्कोडा गाडी भरधाव वेगात आली. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने पहिले रस्त्याच्या डाव्या बाजुच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर उलट दिशेला वाहन नेत रस्त्याच्या कडेने पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांना उडवलं. त्यानंतरही ही गाडी थांबली नाही. पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कूल बसला या गाडीने धडक दिली.
या भीषण अपघातात सात वर्षीय सार्थक चोपडे आणि 32 वर्षीय वैभव गुरव यांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर सार्थक चोपडेची आई साधना चोपडे (वय 30), श्रध्दा जाधव (वय 31), शिफा ( वय 16), आशिष पाटील (वय 22) आणि प्रशांत माने हे पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.
कामोठे सेक्टर-6 च्या या परिसरात रविवार असल्याने सायंकाळच्या वेळी लोकांची गर्दी होती. दरम्यान सायंकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. स्कोडा चालकाने घटनेनंतर तिथून पळ ठोकला. कामोठे पोलिसांनी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर जखमींना कामोठेच्या एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
VIDEO :