मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मीडियाशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना आव्हान दिलं होतं. तसेच पोलिसांनी आपल्याला चांगली वागणूक दिली नसल्याचं सांगतानाच राज्य सरकारने आपल्यावर अन्याय केल्याचा दावाही नवनीत राणा यांनी केला होता. राणा यांच्या या विधानाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. राणा यांनी कोर्टाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तीचा भंग केल्याप्रकरणी कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचं सरकारी वकील प्रदीप घरत (pradip gharat) यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे नवनीत राणा यांनी आपण कोर्टाच्या अटी आणि शर्तींचा भंग करणारं कोणतंही विधान केलं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी कोर्टाच्या आदेशाचं नेहमीच पालन केलं आहे. आम्ही कोर्टाचा नेहमीच सन्मान करतो, असंही नवनीत राणा यांनी सांगितलं.
नवनीत राणा आज दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाल्या. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा दावा केला. मी कोर्टाचा अवमान केला नाही. आम्ही कोर्टाचा सन्मान करतो. कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं. आम्ही त्या विषयावर बोललो नाही. हनुमान चालिसा आणि मातोश्रीबाबत काही बोललो नाही. आम्हाला वेदना दिल्या, त्यावर मी बोलले, असं नवनीत राणा यांनी सांगितलं. माझ्यावर अन्याय झाला. मी दिल्लीत जात आहे. प्रमुख नेत्यांना भेटणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटणार आहे. जे घडलं ते या नेत्यांना सांगणार आहे. लॉकअप पासून जेलपर्यंतचा व्यवहार कथन करणार आहे. तुरुंगात गेल्यावर आपण लोकप्रतिनिधी नसतो. कैद्यासारखं ट्रीट केलं जातं. पण त्यातही काही नियम असतात, असंही त्या म्हणाल्या.
डॉक्टरांना विनंती करून मी डिस्चार्ज घेतला आहे. माझे अजूनही हेल्थ इश्यू आहेत. माझ्यासोबत जे घडलं त्यावर कुणी कारवाई केली नाही. दंगा कोणी केला तर ठाकरेंच्या गुंडांनी केला. अमरावती आणि मुंबईत शिवसेनेच्या गुंडांनी हल्ला केला. त्याबाबत मी तक्रार केली होती. त्यावर कारवाई झाली नाही. राऊत पोपट आहेत. चवन्नी छाप आहेत. त्यांनी 20 फूट खड्ड्यात गाडू असं विधान केलं. त्यावरही कारवाई झाली नाही. त्यावर कारवाई व्हावी म्हणून मी दिल्लीत जात आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या.
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही साद घातली. अजितदादा डिमोरलाईज करत आहेत. तुम्ही महिलांचा सन्मान करता. मुख्यमंत्री काम करत नाहीत. तुम्ही सर्वात जास्त काम करता. त्यामुळे आमच्यावर काय अन्याय झाला. अटकेपासून ते तुरुंगापर्यंतची माहिती घ्या. त्यानंतर तुम्ही भाष्य करा. तुम्ही रोखठोक बोलणारे आहात. तुम्ही न्याय द्याल ही अपेक्षा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
भाजपच्या पाठित खंजीर खुपसणाऱ्यांनी सिद्धांताची गोष्ट करू नये. त्यांनी आम्हाला ज्ञान सांगू नये. शिवसेनाप्रमुख हे सिद्धांत पाळणारे नेते होते. त्यांच्याबरोबर सिद्धांतही गेले, असं त्या म्हणाल्या. पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज्य चालवलं होतं. पण श्रृड राजकारण केलं नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याकडून राज्य कसं चालवायचं ते शिकावं, असा टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेना प्रवक्त्या किशोरी पेडणेकर या लिलावती रुग्णालयात जाणार आहेत. राणा अॅडमिट असताना कॅमेरे आत गेलेच कसे याची त्या माहिती घेणार आहेत. त्यावरही नवनीत राणा यांनी भाष्य केलं. आम्ही लढणारे लोक आहोत. घाबरणारे नाही. त्यांना काही काम नाही. त्यांच्याविरोधात जे लोक बोलतात त्यांच्यावर कारवाई केली जाते, असंही त्या म्हणाल्या.