मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) सध्या कोठडीत आहेत. मात्र मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ज्या वेळी त्यांना ताब्यात घेतले त्यावेळी राणा यांचा छळ झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. रात्रभर खार पोलीस स्टेशनमध्ये पाणीही देण्यात आले नाही, जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली, कारण मी अनुसूचित जातीची आहे, त्यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्क नाकारण्यात आला, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणावरून भाजपसह विरोधकांनी महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली. हे प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही. तर थेट केंद्रापर्यंत पोहोचले. राणा यांनी याची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी याचा अहवालही मागवला. तसेच आम्ही अहवाल देणार आहे. राणा यांचा पोलीस कोठडीत असा कोणताही छळ झाला नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देले. मात्र या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. ज्यात राणा यांना पोलीस ठाण्यात चहा पिताना, व्यवस्थित वागणूक मिळत असल्याचे दिसते आहे.
Do we say anything more pic.twitter.com/GuUxldBKD5
— Sanjay Pandey (@sanjayp_1) April 26, 2022
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांवर टीकेची झोड उडवली पोलिसांची विनाकारण बदनामी करण्याचा हा डाव असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र काही वेळात राणांच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. हा व्हिडिओ हा राणा यांना खार पोलीस ठाण्यात आणले तेव्हाचा आहे. मात्र छळ हा सांताक्रुझ पोलिसांनी कोठडीत नेल्यानंतर रात्री दीड वाजल्यानंतर केला, असा दावा राणा यांच्या वकिलांकडून आता करण्यात आलाय. त्यामुळे मुंबई पोलिसांनी ट्विट केलेला हा व्हिडिओ नेमका कधीचा असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
मनिषा कायंदे यांनी राणा यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, नवनीत राणा, हे राजकारण आहे, सी ग्रेड चित्रपट नाही, याचे भान राखा. दुसऱ्याने लिहून दिलेले स्क्रिप्ट वाचुन नाटक करणे हे तुमच्या चित्रपटात ठीक होते, आता भानावर या, अन्यथा शिवसेनेच्या रणरागिणी तुम्हाला ताळ्यावर आणतील. असा इशाराच त्यांनी दिला आहे.
नवनीत राणा, हे राजकारण आहे, सी ग्रेड चित्रपट नाही, याचे भान राखा. दुसऱ्याने लिहून दिलेले स्क्रिप्ट वाचुन नाटक करणे हे तुमच्या चित्रपटात ठीक होते, आता भानावर या, अन्यथा शिवसेनेच्या रणरागिणी तुम्हाला ताळ्यावर आणतील.@AUThackeray @ShivsenaComms @BJP4Maharashtra @BJP4Mumbai pic.twitter.com/WJAxJY16OY
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) April 26, 2022
मागसवर्गीय असल्याने पोलिसांनी वाईट वागणूक दिली असा जातीयवादी आरोप करून मुंबई पोलीस दलाला बदनाम करायचे. अधिकार्यांचे, कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचा नवनीत राणा यांचा डाव होता असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. मुंबई पोलिस जातीयवादी असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी करताना याची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे केली होती. यावर महेश तपासे यांनी नवनीत राणा यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. दरम्यान खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे पोलीस ठाण्यात चहापान करत असल्याचे एक व्हिडिओ समोर आला असून जातीच्या नावावर खोटी तक्रार करणार्या नवनीत राणा यांच्यावर लोकसभा अध्यक्ष कोणती कारवाई करणार आहे असा सवालही महेश तपासे यांनी केला आहे.