मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांचा पोपट असा उल्लेख केला आहे. संजय राऊत यांच्याविरोधातील प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचं सांगतानाच राऊत यांच्याविरोधात दिल्लीत तक्रार करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राऊत यांच्याविरोधात तक्रार करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं. तसेच राऊत आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. लिलावती रुग्णालयातून चार दिवसानंतर नवनीत राणा यांना डिस्चार्ज मिळाला. यावेळी त्या मीडियाशी संवाद साधत होत्या. यावेळी राणा यांचं त्यांच्या समर्थकांनी औक्षण आणि ओवाळणी करत स्वागत केलं. यावेळी राणा यांना हनुमानाची मूर्ती आणि जय श्रीराम लिहिलेली शाल भेट देण्यात आली. या प्रसंगी जय श्रीरामच्या घोषणाही देण्यात आल्या.
पोपटाने सांगितलं वीस फूट खड्ड्यात गाडू. पण मी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे. दिल्लीत जाऊन मी तक्रार करणार आहे. पंतप्रधानांकडेही त्यांची तक्रार करणार आहे. त्यांना सोडणार नाही, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला.
यावेळी त्यांनी आपली तब्येत अजून बरी नसल्याचंही स्पष्ट केलं. आपल्याला अजूनही स्पॉयन्डिलाईसेसचा त्रास होत आहे. लोअरवेस्टमध्ये वेदना होत आहे. माझी तब्येत अजूनही ठिक नाही. ओपीडीच्या माध्यमातून मी उपचार घेणार असल्याचं सांगून मला आजच डिस्चार्ज देण्याची मी डॉक्टरांना विनंती केली होती. त्यामुळे मला आज डिस्चार्ज मिळाला, असं त्यांनी स्पष्ट केलं. 14 दिवस आत आणि 4 दिवस तुरुंगात असल्यामुळे माझी मेंटेली हॅरेसमेंट झाली. त्यामुळे मी डिस्चार्ज घेतला, असं त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी पुन्हा एकाद पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवर बोट ठेवलं. मला चटईही दिली नाही. मला सहा तास तुरुंगात उभं राहावं लागलं. मला गुन्हेगारासारखी वागणूक दिली गेली, असा दावा राणा यांनी केला. ठाकरे सरकारने माझा छळ केला. माझा गुन्हा तरी काय होता? हनुमाना चालिसा म्हणणं, रामाचं नाव घेणं हा गुन्हा आहे का? असा सवालही त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवावी, मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढेल, असंही त्यांनी सांगितलं.